खान्देश वार्ता-(चोपडा प्रतिनिधी)
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मनवेल गावातील एका तरुण प्रयोगशील शेतकऱ्याने कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेतले असून निर्यातीच्या माध्यमातून कमी अवधीत लाखो रूपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातले प्रयोगशील युवा शेतकरी दिनदयाळ समाधान पाटील उर्फ बाबा यांनी आपल्या चार एकर शेतात कलिंगडाचे पिक घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती त्यांनी मिळवली. पिक घेण्यासाठी आवश्यक खर्चाची आणि मनुष्यबळाची जुळवाजुळव करून त्यांनी कामाला सुरूवात केली. अवघ्या तीन महिन्यात अगदी विक्रमी पीक हाती आलं आणि त्यांनी या पिकाची निर्यात करण्याचा निर्णय घेतला.
आनंदाची गोष्ट म्हणजे या कामासाठी त्यांना साधारण अडीच लाख रूपये खर्च आला आणि सर्व खर्च वजा जाता १५ लाख रूपये इतका निव्वळ नफा त्यांना मिळाला. दिनदयाल समाधान पाटील(बाबा) आपल्या मनोगतात म्हणाले की,लहानपणापासून शेतीचे आवड आहे. केळी या पारंपरिक पिकासोबत ह्या वर्षी मी टरबूजाचे उत्पादन घेण्याचे ठरवले त्यासाठी मित्र कुणाल देविदास पाटील याची मदत झाली. टरबुज या पिकाला चांगला निर्यात दर मिळाला ते लक्षात घेऊन भविष्यातही मी हे पीक घेत राहीन.
युवा शेतकरी यांनी शेतीकडे वळले पाहिजे व नवीन तंत्रज्ञानाच्या वापर करून शेती केली पाहिजे.
शासकीय योजनांचा लाभ घेऊन विक्रमी नफा घेत आदर्श निर्माण करण्याऱ्या या शेतकऱ्याने इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठीही एका नव्या उत्पन्नाचे दार खुले केले आहे. शेतीकडे वळू इच्छिणाऱ्या युवा पीढीसाठी हे निश्चितच प्रेरक आहे.