खान्देश वार्ता-(धुळे)
शिरपूर तालुक्यातील रेकलीयापाणी धरणाच्या वाहत्या पाण्याजवळ गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना गांजा शेती होत असल्याची माहिती मिळाली. धिवरे यांना या परिसरात तीन एकर गांजाची शेती ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून आढळून आली. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिसांच्या पथकासह कारवाई केली.
या परिसरातील गांजा शेतीत दलातील काही गंजाेळी हे शेतकऱ्यांचे पार्टनर आहेत. असे वृत्त खान्देश वार्ताने दिले हाेते. या कारवाईनंतर व या वृत्तानंतर तशी चर्चा जाेर धरून आहे. कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार असल्याचे चर्चिले जात आहे. कारवाई करण्याऐवजी थेट गांजा शेतीमध्ये पार्टनर होऊन काहींनी आपला खिसा गरम करण्याचे स्वप्नं पाहिले होते. गांजा शेतीवर कारवाई न करता थेट ५ लाखात शेती ताबे गहाण ठेवण्याची बोली पक्की झाली हाेती असे समजते.
संबंधित शेतकरी सांभाळ करणार हाेता आणि दलातील गंजाेळी पार्टनर गांजा विक्रीतून मालामाला हाेणार हाेता. त्यापाेटी शेतकऱ्याला २ लाख रुपये अँडव्हान्स म्हणून राेख दिले हाेते. तर उर्वरित रक्कम तीन लाख रुपये शेतीमधील गांजाची विक्री झाल्यानंतर देऊ असे ठरले होते. मात्र कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांच्या सतर्कतेमुळे स्वप्नं भंगल्याने संबंधित गंजाेळी पार्टनर आपल्याच सहकाऱ्यांनी आपले कांड केले म्हणून शिव्यांची लाखाेली वाहत तांडव करीत असल्याचे कळते.
दुसरीकडे वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकानीं केलेल्या गांजा शेतीच्या कारवाईमुळे मोठा धसका बसला आहे. मात्र वनविभागातील अधिकारी याबाबत अद्यापपर्यंत नेमकं काय? याबाबत आपली बाजू मांडण्यास तयार नाहीत. त्यामुळे पाेलीस दल आणि वनविभागातील गंजोळी पार्टनर कोण? याचा पोलीस अधीक्षकांनी खोल मुळापर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे. आणि संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.