(खान्देश वार्ता)-धुळे
जिल्हा पोलीस प्रशासनाने थर्टी फर्स्टला कारवाईचा बडगा उगारला. यात गावठी पिस्टल, जिवंत काडतुसे, गुटखा असा सुमारे एकूण १२ लाख ५४ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. धुळे पोलिसांकडून एकाच दिवशी अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३२८ कायदेशीर कारवाया केल्या असून यात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या ९१ केसेस, मोटार वाहन कायद्यान्वये ११७ केसेस दाखल झाल्या आहेत. या सोबतच शिरपूर शहर पोलिसांनी दोन गावठी पिस्टल पाच जिवंत काडतुस असा सुमारे ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारूबंदी कायद्यान्वये तब्बल ९९ केसेस पोलिसांनी दाखल केले असून यात एक लाख ६१ हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच जुगार कायद्यान्वये १९ केसेस दाखल करण्यात आल्या असून सुमारे अकरा हजार ७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तसेच तालुक्यातील पोलिसांनी सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन लाख २४ हजार ६४० रुपये किमतीचा गुटखा, आणि आठ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा सुमारे दहा लाख २४ हजार ६४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. एकाच दिवसात पोलिसांनी तब्बल ३२८ कायदेशीर कारवाया करून बारा लाख ५४ हजार २३५ रुपये किमतीची दंड रक्कम आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरून होणारी गुटख्याची तस्करी रोखत नगावबारी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सव्वादोन लाखांचा गुटखा व पाच लाखाचा ट्रक असा मुद्देमाल काही दिवसांपूर्वी जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोनगीरकडून धुळ्यामार्गे ट्रकमधून राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रेय शिंदे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरातील नगावबारी शिवारात सापळा रचून संशयित ट्रकला ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला. या कारवाईत एकूण ७ लाख १५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.