
खान्देश वार्ता-(धुळे)
नंदुरबार जिल्ह्यातील दोन तालुक्यांना जोडणाऱ्या दुर्गम भागातील चांदसैली घाट अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असून त्या ठिकाणी जीव घेणे खड्डे आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मात्र असे असताना सातवीचा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर या घाटातील रस्ते बुजवत आहे. त्यासाठी तो रस्त्यावर वर्गणी मागून लागणारे साहित्य खरेदी करत जीव घेण्या खड्ड्यांपासून नागरिकांना वाचवण्यासाठी धडपड करत आहे.
सातपुड्यातील दुर्गम भागाला जोडण्यासाठी धडगाव ते तळोदा दरम्यान चांदसैली घाटाची अनेक वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली होती. मात्र असे असले तरी पावसाळ्यात या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडतात. त्यामुळे नागरिकांचा प्रवास बंद होतो. त्यातच अनेक वर्षापासून संबंधित विभागाने या घाटातील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीव घेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेकदा मोठ्या प्रमाणावर अपघात होतात. अनेकांना आपले जीवही गमवावे लागले आहेत. मात्र असे असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.

मात्र सातवीत शिकणारा आदिवासी विद्यार्थी देवसिंग पावरा हा चिमुकला, शाळा सुटल्यावर याच घाटात प्रवाशांकडून मदत गोळा करून खड्डे बुजवत आहे. त्याच्या या धडपडीमुळे शासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच घाटात अनेकदा अपघात होतांना त्यांनी पाहिले.
नागरिकांचे जीव जाऊ नये यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवत शाळा सुटल्यानंतर थेट तो घाटात येतो व त्या ठिकाणी असलेले खड्डे स्वतः बुजवतो. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना हात जोडून तो खड्डे बुजवण्यासाठी मदत मागतो.
प्रवाशांनी दिलेल्या पैशांतून तो माती आणि दगड विकत घेतो आणि फावडे व टोपलीच्या मदतीने स्वतः खड्ड्यांमध्ये भरतो.
त्याच्या कार्याला नागरिक ही प्रतिसाद देत असून त्याचे कौतुक करत आहेत. असे असताना प्रशासन याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्याच्या या कृतीमुळे रस्त्यावरील अनेक खड्डे बुजवले गेले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे.



