सामाजिकजळगाव

माझं गाणं खणखणीत नसतं तर लोकांनी मला बाजूला फेकून दिलं असतं

प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी प्रकट मुलाखत


खान्देश वार्ता-(धुळे)
साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : ‌‘माझं गाणं खणखणीत नसतं तर लोकांनी मला बाजूला फेकून दिलं असतं,’ असे मत प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर (श्रीरामपूर) यांनी प्रकट मुलाखतीत व्यक्त केले.

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी सकाळी सभामंडप -1 खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर प्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर (बदलापूर) यांनी ही मुलाखत घेतली. त्यात बाबासाहेब सौदागर यांनी आपला जीवनपट उलगडला.

IMG 20240204 144700

माजी आजी व बहिणाबाई सख्ख्या मावस बहिणी?
घरात पुस्तकाचे, साहित्याचे असे कुठलेच वातावरण नव्हते. माझी आजी 105 वर्षे जगली. तिने मला ओव्या शिकवल्या. ओव्या, कविता काय असते, हे तिने मला शिकवलं. घरात आई चिडत असेल तर ती काव्यातूनच. तिच्या ओव्या मी ऐकायला लागलो. ते ऐकता, ऐकता मी बहिणाबाई वाचायला लागलो. बहिणाबाई ऐकत असताना, वाचत असताना वाटायचं की, माजी आजी आणि बहिणाबाई या सख्ख्या मावस बहिणी तर नाही ना? पुढे मी व्यंकटेश माडगूळकर आदी वाचायला लागलो. पुढे ना.धों. महानोरांना वाचायला लागलो. यातून माझं खान्देशशी नातं जुळलं. हे नातं पुढे घट्ट जुळलं.

आजीच्या चालीवर गाणी म्हणायला लागलो…
चित्रपट पाहात असताना सिनेमा सुरू होण्याआधी नावांच्या पाट्या येतात. त्यात गीतकार जगदीश खेबुडकर अशी काही नावं यायची. तेथे आपलंही नाव आलं पाहिजे, असं वाटायचं. तेव्हा गीतकार म्हणून काम करायचं असं ठरवलं. चित्रपटासाठी मी कोल्हापुरात गेलो. माझ्यासारख्या फाटक्या माणसाला कोणी उभे करीत नव्हते. कोल्हापूरला जाण्यासाठी भाड्याला पैसेही नसायचे. मग घरातील पितळाची एकेक भांडी मोडून त्या पैशाद्वारे जायचो. पुढे माझी मुंबई दूरदर्शनला मुलाखत झाली.

प्रसंगी निसर्गकवी बाजुला ठेवावा लागतो….
आजीला ओव्यांचे संस्कार होते. आजीच्या चालीवर गाणी म्हणायला लागलो. त्याचा गीतांसाठी चांगला उपयोग झाला. उत्तराताई केळकर यांनी आपलं गाणं गावं, अशी माझी इच्छा होती. ती पूर्ण झाली. चित्रपटासाठी गीतांची मागणी झाल्यावर मला माझ्यातला निसर्गकवी बाजुला ठेवावा लागतो. मी चांगल्या लावण्या लिहितो, पण त्या घेणारा मला भेटावा, अशी अपेक्षा असते.

IMG 20240204 144631

चित्रपटाचे दिग्दर्शक कडक लावणी मागतात. गाणं नसतं तर मी जगलो नसतो, फक्त एक पेन आणि चार कागद हेच माझं साधन आहे. माझं गाणं खणखणीत नसतं तर लोकांनी मला बाजुला फेकून दिलं असतं. चित्रपटासाठी गाणं निवडताना समोर 10 माणसं असायची. एकेक जण त्यात त्रुटी काढायचा. पण त्यांच्या मागणीनुसार, मी गीतं लिहून द्यायचो. पुढे गीतं लिहिताना चाल, धून यानुसार गीतांसाठी आव्हानं स्वीकारली. लावणी, युगल गीते, देशभक्तीपर, संभाजी, जिजाऊंवर गीते ही मागणीनुसार लिहित गेलो. दिग्दर्शकाला काय हवंय, ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. कोणतीही गाणी ही ठरवून लिहिली नाही तर परिस्थितीनुसार ती लिहिली गेली. यशाचा एक हार झेलायचा असेल तर 100 प्रहार सहन करावे लागतात. मुलाखत सुरू असताना व्यासपीठावरील स्क्रिनवर गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी लिहिलेली काही गाणं दाखविण्यात आली. मराठी वाङ्मय मंडळाचे कार्यकारिणी सदस्य संदीप घोरपडे यांनी सूत्रसंचालन केले.

जीवनात पाच पांडवही भेटले…
बाबासाहेब सौदागर म्हणाले, माझ्या प्रवासात मला 100 कौरव भेटले, यांनी मला थकवले. तसे पाच पांडवही भेटले आणि एक कृष्णही भेटला. या पाच पांडवांमध्ये प्राचार्य तानसेन जगताप, मनोहर आंधळे, कविवर्य रमेश पवार, कविवर्य रमेश माने आणि डॉ.अमोघ जोशी यांचा समावेश आहे आणि या सर्वांना सांभाळणारा कृष्णाच्या रुपात डॉ.अविनाश जोशी भेटले.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + 11 =

Back to top button