क्राईमधुळे

धुळे तालुक्यात बिबट्याच्या हल्लामुळे वनविभागाची निष्क्रियता आली समोर

(खान्देश वार्ता)- धुळे
तालुक्यातील मोघण,बोरकुंड,होरपाडा,मांडळ गावांच्या परिसरात नरभक्षक बिबट्याने हैदोस घातला असून बिबट्याचा वावर असल्याचे वनविभागाला सांगूनही दूर्लक्ष केले. त्यामुळे वनविभागाबद्दल ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांमध्ये संताप असून त्यातून वनविभागाची निष्क्रीयता समोर आली आहे. वनमंत्र्यांना भेटल्यांनतर धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी मुंबईहून थेट मोघण,बोरकुंड येथील घटनास्थळाला शुक्रवारी सायंकाळी भेट दिली. आ.पाटील यांनी ग्रामस्थांची भेट घेत बिबट्याला जेरबंद करण्यात लवकरच यश मिळेल असे सांगत धीर दिला, मृत बालकांच्या कुटूंबियांना भेटून त्यांची विचारपूस करुन सात्वनही केले. दरम्यान वन विभागाने यापुढे गांभीर्याने काम करीत वन्य प्राण्यांपासून जनतेचे व पाळीव जनावरांचे रक्षण करावे अशाही सूचना आ.पाटील यांनी दिल्या.

गेल्या तीन ते चार दिवसात धुळे तालुक्यातील नंदाळे आणि बोरकुंड येथील दोन बालकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर एक जण गंभीररित्या जखमी आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड,मोघण,मांडळ,होरपाडा या परिसरात नरभक्षक बिबट्याने धुडगूस घातला आहे. सदर बिबट्याचा बंदोबस्त व्हावा म्हणून आ.कुणाल पाटील यांनी गुरुवार दि.२६रोजी रोजी वनमंत्री ना.सुधिर मुंनगटींवार यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेतली.

या बिबट्याला जेरबंद करा किंवा बेशुध्द करणे आणि तसे न झाल्यास ठार मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर या भागात पुण्याहून तात्काळ बिबट्याच्या शोधासाठी रेस्क्यू पथक दाखल झाले आहे. वनविभाग आणि रेस्क्यू पथकाचे यांचे सयुंक्त शोधकार्य सुरु आहे. दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी काल शुक्रवारी सायंकाळी मुंबईहून परत येवून थेट मोघण,बोरकुंड  या घटनास्थळी दाखल झाले.

आ.पाटील यांनी ग्रामस्थांशी केली चर्चा….
आ.कुणाल पाटील यांनी मोघण येथील शेतकरी व ग्रामस्थांची चर्चा करीत त्यांना धीर देत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. यावेळी येथील ग्रामस्थांनी वनविभागाच्या अकार्यक्षमतेवर संताप व्यक्त केला.अनेकवेळा तक्रारी करुनही वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. यावरुन वनविभागाची अकार्यक्षमता समोर आली आहे. दरम्यान यापुढे हलगर्जीपणा न करता ग्रामस्थांच्या तक्रारी गाभीर्याने घेत तत्काळ कार्यवाही करण्याचा सूचना आ.पाटील यांनी वन अधिकार्‍यांना दिल्या.

घटनास्थळाची केली पाहणी…
मोघण ता.धुळे शिवारातील धुडकू संपत माळी यांच्या शेतात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली या शेतात जाऊन आ.कुणाल पाटील यांनी वनअधिकारी व कर्मचार्‍यांसमवेत घटनास्थळाची पहाणी केली.चि.रमेश नानसिंग भादवे या बालकांवर शेतात खेळत असतांना बिबट्याने हल्ला केला व फरफटत ओढत नेले.त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. या सर्व घटनेची घटनास्थळी जावून आ.पाटील यांनी इत्यंभूत माहिती जाणून घेतली.

पिंजरे-सापळा आणि रेस्क्यू..
आ.कुणाल पाटील यांच्या मागणीवरुन वनविभाग खडबडून जागे झाले आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोघण,होरपाडा,बोरकुंड परिसरात वनविभागाने सुमारे १५ पिंजरे लावले आहेत. तर पुण्याहून गुरुवार दि.२६ रोजी रात्री रेस्क्यू पथक दाखल होवून त्यांनी तत्काळ सापळा लावला आहे. ड्रोन कॅमेराचा वापर करुन बिबट्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळेल अशी खात्री रेस्क्यू पथकातील स्वयंसेवकांनी दिली आहे.

दिवसा वीजपुरवठ्याची मागणी…
नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकर्‍यांनी रात्रीचे शेतात जाणे बंद केले आहे.भारनियमनामुळे बोरकुंड,मोघण,मांडळ यासह बोरी पट्टयात शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आ.कुणाल पाटील यांच्याकडे शेतकर्‍यांनी केली. त्यानुसार आ.कुणाल पाटील यांनी मोघण ता.धुळे येथूनच मोबाईलव्दारे अधिक्षक अभियंता,वीज वितरण कंपनी यांच्याशी संपर्क साधून शेतकर्‍यांच्या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आ.कुणाल पाटील यांनी घटनास्थळी दाखल होवून ग्रामस्थांची चर्चा करुन त्यांना धीर दिला.दरम्यान ग्रामस्थांनी स्वरक्षणासाठी रात्रीच्यावेळी घराबाहेर पडू नये तसेच अंगणात  झोपू नये, तसेच गावातील तरुणांनी जागता पहारा देवून आपले व गावाचे रक्षण करावे असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी यावेळी दिले.दरम्यान मी तुमच्या प्रत्येक संकटात खंबीरपणे उभा असून कोणीही धीर सोडू नये असेही आ.कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आ.कुणाल पाटील यांच्यासोबत वनविभागाचे विभागीय वन अधिकारी राजेंद्र सरगर,वनक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील,संचालक साहेबराव खैरनार,माजी सभापती गुलाबराव कोतेकर,खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे,तालुका काँगे्रस अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे,जि.प.सदस्य अरुण पाटील,संचालक ऋषीकेश ठाकरे,सरपंच नागेश देवरे,नरेंसिंग देवरे,पं.स.सदस्य दिलीप देसले आदी उपस्थित होते.

बिबट्याच्या हल्ल्यात मोघण येथे चि.रमेश नानसिंग भादवे हा मुलगा जखमी झाला आहे. त्याची आ.कुणाल पाटील यांनी धुळे जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकार्‍यांकडून वैद्यकीय अहवालाची माहिती घेतली व उपचारात कोणतेही दुर्लक्ष न करता आवश्यक ते सर्व वैद्यकीय औषधोपचार करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × four =

Back to top button