महापालिका प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांचे चेहरे उघडे होतील का.?
(खान्देश वार्ता)-धुळे
शहराच्या महापौर प्रतिभा चौधरी यांच्या घराजवळून ते इंदिरा गार्डनच्या प्रवेशद्वारापर्यंत काँक्रिटीकरण रस्ता गेल्या काही महिन्यांपूर्वी तयार झाला. मात्र रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हापासूनच निरनिराळ्या शंका आणि वाद होत होते. तर आता येथे कॉक्रिटकरणावर डांबरीकरण करत निकृष्ठता लपविण्याचा प्रयत्न जनतेने समोर आणला आहे. आयुक्त, महापौर, शहर अभियंता, आठ नगरसेवक याच भागात राहतात. दररोज सर्वच जण हे पाहतात.
सामान्य नागरिक म्हणून आम्हाला वाटतं की, हे चुकीचं होत आहे. मात्र यापैकी एकालाही वाटू नये की, हे चुकीचे होत आहे. अशा प्रवृत्तीमुळे भाजप पक्षाची बदनामी होत आहे. सामान्यांच्या कष्टाच्या पैशांतून ठेकेदारांची मौज होत आहे. वाईट प्रवृत्तीला आपला कडाडून विरोध राहील. यासाठी समविचारीनी पुढे येत पायबंद घातला पाहिजे. आता जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही. असा निर्णय या भागातील रहिवाशांनी घेतला आहे. प्रशासकांचा बाणा मुजोर ठेकेदारांना वठणीवर आणतील का.? महापालिका प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांचे चेहरे उघडे होतील का.? असा सवाल ही नागरिकांनी प्रसार माध्यमातून महापालिका प्रशासनाला केला आहे.
तर महापालिका प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी आहे त्या स्थितीत हे काम थांबविण्याचे व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेशित केले आहे. दरम्यान या रस्त्याच्या मध्ये फक्त पेव्हर ब्लॉक असून, दोन्ही बाजुला सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे.
शहरातील इंदिरा गार्डन परिसरातील रहिवासी दीपक काकुस्ते यांना नव्याने तयार झालेल्या काँक्रीट रस्त्यावर डांबरीकरण हा प्रकार विचित्र वाटला. त्यांनी संबंधित पाटील नामक ठेकेदारास याबाबत विचारणा केली असता त्याने हा मुंबई पॅटर्न असल्याचे सांगितले. आपणास या कामाबाबत आयुक्तांचेच आदेश आहेत असे उत्तर ही त्याने दिले. मात्र लेखी स्वरूपात माहिती असल्याचे विचारल्यावर लेखी नाही,तर तोंडी आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले.
मात्र शुक्रवार (दि.१९) पासून या कामाबाबत तक्रारी येत होत्या. यापूर्वी नागसेन बोरसे यांच्यासह काही जणांच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने जितके काम झाले आहे तेवढे बिल दिले आहे. पण, बिल देताना या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करणे, निकृष्ट काम पुन्हा नव्याने करणे अशा सूचना मी फाइलवर दिल्या आहेत.
आता कॉक्रिटीकरणावर डांबरीकरणाचा जो लेअर टाकला जात आहे. हा प्रकार नियमांच्या बाहेर असल्याचे सांगितले जात आहे. तर आहे त्या स्थितीत काम थांबविण्यात आले असून संबंधित ठेकेदारास नोटीस बजावली जात आहे. निश्चित कारवाई होणार असून एक रुपयाही बिल दिले जाणार नाही. कोणतीही कामे निकृष्ट होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी दिला आहे.
तसेच तक्रारदार दीपक काकुस्ते यांनी आयुक्तांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवत त्यांना याबाबत सांगितले. त्याही अवाक झाल्या आणि असे कुठे होऊ शकते का, असा प्रश्न विचारला. या निकृष्ट कामाबाबात नागसेन बोरसे यांच्यासह अनेकांनी तक्रारी केल्या, मात्र त्यांची दखल घेण्यात आली नाही. अखेर या परिसरातील नागरिकांनीच सूत्रे हाती घेतले व प्रसार माध्यमातून बातमी समोर आल्यानंतर महापालिका प्रशासनाने दखल घेतली.