धुळे जिल्ह्यातील एक लाख बेरोजगारांना मिळणार रोजगार, मा.आ.अनिल गोटे

(खान्देश वार्ता)-धुळे
जिल्ह्याचा औद्योगिक व आर्थिक विकास न झाल्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना दहा पंधरा हजाराच्या नोकरीसाठी पुणे मुंबईला स्थलांतरित व्हावे लागते ही दुर्दैवी बाब आहे. म्हणून जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवरच काम मिळावे यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील किमान एक लाख बेरोजगारांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊ शकेल अशा एका प्रकल्पास मंजुरी मिळाल्याची माहिती मा.आ.अनिल गोटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
धुळे शहरालगत रावेर येथे १ हजार ८०० एकर शासकीय रिक्त जमिनीवर ट्रान्सपोर्ट हब तसेच ड्रायफूट व अन्य व्यवसाय सुरू करण्याची मंत्री महोदयांनी पूर्णतः अनुकूलता दर्शविली असल्याचे माजी आमदार गोटे यांनी यावेळी सांगितले. गोटे म्हणाले की, धुळे जिल्ह्यात मोठा औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी आपली राजकीय इच्छाशक्ती अपूर्ण पडली. त्यामुळेच आजूबाजूचे जळगाव नाशिक औरंगाबाद इत्यादी जिल्ह्यांचा विकास झाला पण धुळे जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे धुळे शहरातील एमआयडीसी आता पूर्ण भरली असून वसाहतीत जागा शिल्लक नाही असे औद्योगिक वसाहतीचे अधिकारी सांगतात.
नरडाणा औद्योगिक वसाहतीचा प्रश्न तसाच अर्धवट पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात नाहीत. आणि शेतकऱ्यांच्या जमिनीची किंमत निश्चित केली जात नाही. मागील दहा वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित पडला आहे. सध्या स्थितीत नरडाणा औद्योगिक वसाहती मत साठी शेतकऱ्यांच्या जमिनी मोकळ्या तरी करून द्या, अन्यथा औद्योगिक वसाहतीची तरी उभारणी करा, त्याशिवाय बेरोजगारीच्या प्रश्नावर मार्ग निघू शकत नाही.
धुळे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि धुळे जिल्ह्याच्या विकासाचे दरवाजे खुले व्हावे यासाठी आपण मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा प्रश्न लावून धरला होता. परंतु मागील १० वर्षात मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी सकारात्मक काम झाले नाही. एखाद्या विकासाच्या प्रश्नाचे कसे वाटोळे करावे, हे धुळे जिल्ह्यातील प्रस्थापित नेतृत्वास नव्याने शिकवण्याची आवश्यकता नाही.
हा त्यांच्या रक्तातील गुण होय. त्यांचा डीएनए तसा आहे. मनमाड इंदोर रेल्वे मार्ग फायद्याचा आहे. हे सिद्ध झाल्यानंतर सलग चौथ्यांदा मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करून फायद्याचा असलेला रेल्वे मार्ग तोट्यात घालण्याचे काम मात्र प्रस्थापित नेतृत्वाने केलेले आहे. परंतु आपण धुळे जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न सोडून दिलेला नाही. आपल्या सातत्याने पाठपुराव्यामुळे धुळे जिल्ह्यातील किमान एक लाख बेरोजगारांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊ शकेल अशा एका प्रकल्पास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे.
राज्य सरकारच्या औद्योगिक विभागाचे सदर उद्योगासहमती द्यावी यासाठी गडकरींनी स्वतः राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली व मान्यता मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. याबाबत आपण उद्योग मंत्री सामंत यांचे नागपूर येथे भेट घेतली होती. त्यांनी यासंबंधीचा लेखी प्रस्ताव पुढील आठवड्यात शासनाला पाठवण्याचे मान्य केले आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर धुळे शहराजवळील रावेर एमआयडीसी फेज दोन मधील १ हजार ८०० एकर जमिनीवर ट्रान्सपोर्ट हब व ड्रायफूट व्यवसाय सुरू होऊन जिल्ह्यातील सुमारे एक लाख बेरोजगारांना निश्चितच रोजगार प्राप्त होईल. अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.