शासनाचा शासन आपल्या दारी हा उपक्रम केवळ दिखावुपणा- ना.अंबादास दानवे
(खान्देश वार्ता)-धुळे
धुळ्यात घेतलेल्या जनता दरबारात ५३४ अर्ज प्राप्त झाले. त्यात १४० जणांना पत्र दिले. तर ३९ तक्रारींचा जागीच निपटारा करण्यात आला. काही विषय धोरणात्मक तर काही सामुदायीक आहेत. काही विषयांवर आताच जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ, मनपाचे अधिकारी व विविध विभागांच्या अधिकार्यांशी चर्चा केली. चर्चेत देखील उर्वरीत धोरणात्मक निर्णय मार्गी लागतील. तर आवश्यक विषयांवर राज्यस्तरावर बैठक घेण्यात येईल, अशी माहीती आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रंसगी त्यांनी शासनाचा शासन आपल्या दारी हा उपक्रम केवळ दिखावुपणा ठरल्याची टिकाही त्यांनी केली. साक्री रोडवरील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अशोक धात्रक, उपनेता शुभांगी पाटील, माजी आ. प्रा. शरद पाटील, अतूल सोनवणे, हेमंत साळुंखे, डॉ. सुशील महाजन आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना ना. दानवे यांनी जनता दरबारातील एका अपंग व्यक्तीचा प्रश्न उपस्थित केला. त्या अपंग व्यक्तीने पाच वर्षापासून चकरा मारून देखील मला अंत्योदयचे कार्ड मिळत नसल्याचे सांगितले. तेव्हा मी या विषयात पत्र देण्याऐवजी थेट संबंधीत अधिकार्याला फोन केला.
अधिकार्यांने संबंधीत व्यक्तीला माझ्याकडे पाठवा मी तत्काळ कार्ड देतो, असे सांगितले. त्यानुसार दोन तासात त्या व्यक्तीस कार्ड देण्यात आले. वास्तविक हा लहान विषय होता. मात्र हा व्यक्ती गेल्या पाच वर्षापासून शासनाच्या दारातच जात होता. जर पाच वर्षापासून हा अपंग व्यक्ती शासनाच्या दारात जात असेल आणि त्याची जर प्रशासन दखल घेत नसेल तर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम दिखावुपणाचा ठरला असल्याचेही ते म्हणाले.
जनता दरबारात महापालिकेतील अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. ते प्रश्न राज्यस्तरावर मांडले जातील. मनपाच्या पाणीपुरवठ्याची १५४ कोटीची योजना, ही योजना या आधीची योजना आणि आताची योजना यात कोणताही मेळ नाही. त्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच सरकारने शेतकर्यांना मोठ्या मदतीची घोषणा केली. पंरतू अद्याप २०१८-१९-२०२०-२१-२०२२-२३ चे अनेक अनुदान, इन्शुरन्सचे पेसे अद्याप बर्याच ठिकाणी आलेले नाही. हे प्रश्न सोडविण्याची निश्चितच प्रयत्न करले, असेही ना. दानवे यांनी यावेळी सांगितले.