खान्देश वार्ता-(धुळे)
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या मिशन उत्कर्ष कार्यक्रमात दुर्लक्ष व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी धुळे तालुक्यातील वडणे येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक मिलिंद मधुकर चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिक्षकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जुलै-२०२३ पासून मिशन उत्कर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता उंचावणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनस्त निश्चिती, उपचारात्मक अध्ययन अध्यापन शिक्षक मित्र पुस्तिका बाबत मार्गदर्शन कार्यशाळा शिक्षण परिषदांमधून मार्गदर्शन शिष्यवृत्ती सराव परीक्षा , शैक्षणिक ग्रामसभा, अध्ययन प्रक्रियेचे व्यस्थापन (भविष्य वेधी प्रशिक्षण) इत्यादी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विध्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यात येत आहेत .
जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने जिल्हास्तरावरून पाठपुरावा केला जात होता. दि.३१ मार्च २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्तरावरून वाढ करून त्यांना असर स्तरापर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी वडणे येथील जिल्हा परिषद शाळेस (दि.११) जानेवारी रोजी भेट दिली होती.
त्यावेळी तेथील प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद चौधरी यांना अध्ययन प्रणाली बाबत विचारणा केली असता काहीच माहिती देता आली नाही. याबाबत श्री चौधरी यांना शिक्षण विभागाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित केले आहे का? अध्ययनस्तर वाढीसाठी कोणकोणत्या उपाययोजना, उपक्रम राबविण्यात आले, याबाबत (दि.२०) फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनात सकाळी दहा वाजता सादरीकरण करणेसाठी बोलविण्यात आले होते.
मात्र श्री चौधरी हे सादरीकरणासाठी अनुपस्थित राहिले. त्यांची ही कृती पाहता श्री चौधरी यांनी वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वरिष्ठांचा अवमान केला. तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दुर्लक्ष केल्याने श्री मिलिंद मधुकर चौधरी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम १९६४ मधील भाग दोन च्या पोट कलम ३ (२) नुसार निलंबित केले आहे. जिल्हा परिषद शिक्षकावर झालेल्या या कारवाईने इतर शिक्षकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात असताना काही शिक्षक हलगर्जीपणा करीत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढील काळात देखील जिल्हास्तरीय अधिकारी शाळा भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमाची पडताळणी करणार आहेत. त्यामध्ये कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास अशा शिक्षकांवर देखील कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.