खान्देश वार्ता-(धुळे)
पाेलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गांज्याच्या शेतीत पाय ठेवलाच आहे, तर ताे पूर्णपणे राेवावा. तुम्ही पेरा आम्ही सांभाळून घेऊ, असे शेतकऱ्यांना सांगणारे पोलीस दलातील गंजाेळी पार्टनर काेण आहेत, ते ही हुडकून काढावेत. पुणे व नाशिकसह शहरातही गांजा व एमडी हे सर्रास उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. अल्पवयीन मुलांनाही त्यामुळे व्यसने जडली आहेत. मुलांच्या व्यसनाधिनतेमुळे पालकही डिप्रेशनमध्ये गेले आहेत. ही व्यसनी मुले मानसिक राेगी हाेत आहेत. त्यामुळे त्यालाही पायबंद घालावा.
माजी आमदार अनिल गाेटे यांनी जिल्ह्यात हाेत असलेल्या गांजा शेतीबाबत कितीदातरी पुरावे दिलेले आहेत. मात्र, या शेतीकडे अर्थपूर्ण कानडाेळा केला जात आहे. वन विभाग आणि पाेलीस दलाच्या कृपा आशीर्वादा शिवाय हे कसे शक्य आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक धिवरे साहेब तुम्ही गांजा विषय हाताळलाच आहे तर ताे तडीस न्यावा आणि येथील युवा पिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढावे. वन विभाग आणि पाेलीस दलातील गांजा शेतीतील शेतकऱ्यांच्या गंजाेळी पार्टनरांना हिसका दाखवावा अशी रास्त अपेक्षा आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमा रेषाजवळील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाजवळील गाव-पाडामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गांजाची शेती केली जाते. मात्र आतापर्यंत स्थानिक पोलिसांकडून तात्पुरता नावाला कारवाई केली जात असली तरी जिल्ह्यात प्रथमच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी कारवाई करण्यासाठी घटनास्थळी जाऊन छापा टाकला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. अशीच कारवाई शिरपूर तालुक्यातील अवैध बनावट दारू निर्मिती होत असलेल्या कारखान्यावर व्हावी अशी अपेक्षा केली जात आहे.
जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रेकलीयापाणी धरणाच्या वाहत्या पाण्यालगत व अन्य तीन ठिकाणी गांजांची शेती होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्तरीत्या छापा टाकला असता शेताच्या चारही बाजूनी बाजरी व ज्वारी पिकांच्या मधोमध गांजाची लागवड केल्याचे आढळून आले.
यावेळी पोलिसांनी तीन एकर क्षेत्रात असलेली गांजाची शेती उध्वस्त केली. पाच ते सात फूट उंचीचे गांजाचे झाडे उपटून जप्त करण्यात आली आहेत तसेच एका झोपडीत १०० ते १२० किलो सुका गांजा मिळून आला. या कारवाईत कोट्यावधी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धिवरे यांनी दिली आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी व पथकातील प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, महेंद्र सपकाळ, जितेंद्र वाघ, कमलेश सूर्यवंशी, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी व शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पवार, प्रदीप सोनवणे व पथकातील सागर ठाकूर, ग्यानसिंग पावरा, होमगार्ड रवींद्र पावरा, महेंद्र माळी, सुनील पावरा यांनी ही कारवाई केली आहे.