खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर या सदन शहर वजा गावात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट आहे. दोन सट्टा पिढ्या आणि सात पत्त्यांच्या क्लबमधून लाखोंची रोज उलाढाल होते. येथीलच ग्राहक उदंड असताना अवैध व्यवसायिकांवर नाशिक जिल्ह्याचाही अतिरिक्त भार पडलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ताण पडलेला दिसून येत आहे.
स्थानिक कायम गिऱ्हाईक सांभाळायचे की, नजीकच्या जिल्ह्यातील मर्जी संपादायची. कारण नाशिक जिल्ह्यात अवैध व्यवसाय सद्यस्थितीत बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे तेथील गर्दी पिंपळनेरकडे वळलेली आहे धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही आल्या आल्या कारवाईचा सपाटा लावला होता.
मात्र त्यांची ही कारवाई शिरपूर आणि धुळे पट्ट्यातच दिसून आली. जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या पिंपळनेर पर्यंत अद्यापही ते बऱ्यापैकी रुढल्यानंतरही पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे पिंपळनेर परिसरात बिना बोभाट अवैध व्यवसाय राजरोस सुरू आहेत.
पिंपळनेर हा सिक्युअर झोन असल्यामुळे आपसूकच नाशिक जिल्ह्यातील गिऱ्हाईक इकडे वळलेले आहेत. त्यामुळे येथील अवैध व्यवसायिक आपल्या शाखा वाढविण्याच्या विचारात आहेत. जसा पिंपळनेर परिसर सदन आहे. तसाच या परिसराला लागून असलेला नाशिक जिल्ह्याचा परिसरही सदन आहे. जास्तीचा पैसा हा कोठे टाकावा म्हणून या परिसरातील सदन मंडळी विरंगुळा म्हणून सट्टा तसेच पत्त्यांच्या खेळाला अधिक महत्त्व देतात अशा ग्राहकांची हेडसांड होऊ नये, म्हणून येथील अवैध व्यवसायिकांनी आपल्या शाखा वाढवाव्यात अशी मागणी ते लावून धरत आहेत.
पिंपळनेरचे अवैध व्यावसायिक नाशिक जिल्ह्यातील गिऱ्हाईकांची निकड व मागणी लक्षात घेता शाखा वाढवतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.