खान्देश वार्ता-(धुळे)
शहरातील पारोळा चौफुलीजवळ कृषी महाविद्यालयाच्या पडीत शेतातील काटेरी झुडपात गुंगीकारक औषधांची विक्री करण्याच्या उद्देशाने बसलेल्या ४१ वर्षीय इसमाला आझादनगर पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्या जवळील गुंगीकारक औषधांच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
शहरातील पारोळा चौफुलीजवळ कृषी महाविद्यालयाच्या पडीत शेतात गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्याची माहिती आजादनगर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता शकील सलीम शेख उर्फ शकील शेंधवा (रा. वडजाई रोड, कब्रस्तान जवळ इस्लामिक डे स्कूल धुळे) हा गुंगीकारक औषधे बाळगताना आढळून आला.
त्याच्या जवळून ४ हजार ७२५ रुपयांच्या एकूण २७ गुंगीकारक औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपीकडे वैद्यकीय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान नाही. तसेच आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या औषधांची विक्री केली जात होती. यामुळे आरोपी शकील शेख विरोधात एनडीपीएस कायदा अंतर्गत निरनिराळ्या कलमानव्ये तसेच औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत कलम १८ सी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात व पथकातील योगेश शिरसाठ, गौतम सपकाळे, पंकज जोंधळे, प्रकाश माळी, मुक्तार मंसूरी, सिद्धांत मोरे, मकसूद पठाण, शाकिब शेख, प्रशांत पाटील यांनी केली आहे.