अन्य घडामोडी

धुळे लोकसभा मतदारसंघात विजय कोणाचा..!

खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे लोकसभा मतदार संघात सोमवार दि.२० रोजी मतदान उत्साहात पार पडले. प्रशासन आणि राजकीय कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून देखील मतदानाची टक्केवारी ६० टक्के होवू शकले नाही. त्यात धुळे ग्रामीण मतदार संघात ५७.३१ टक्के आणि मालेगाव मध्य मध्ये ६३.११ टक्के मतदान झाले असल्याने या दोन मतदार संघामध्ये सर्वात जास्त मतदान झाले. मतदानानंतर आता भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत.
मात्र धुळे ग्रामीण्‍ मतदार संघात गेल्या वेळी २०१९ च्या निवडणूकीत ६१.८० टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळच्या तुलनेत मतदान कमी झाल्याने काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होण्याची यंदा शक्यता नाकारता येणार नाही. तर मालेगाव मध्य मध्ये यावेळी ६३.११ टक्के मतदान झाले गेल्यावेळी ५०.३० टक्केच मतदान झाले होते. यामुळे यंदा मुस्लिम मतांचे एकतर्फी मतदान झाल्याने हे मतदान काँग्रेसच्या पारडयात पडून काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य वाढण्यास मदत होणार हे तेवढेच सत्य आहे. असे बागलाण मतदार संघात घडले आहे. गेल्यावेळी याठिकाणी ६४.६८ टक्के मतदान झाले तर यावेळी टक्केवारी घसरत ५६.०४ टक्के मतदान झाले.
यामुळे या मतदार संघात मतांची टक्केवारी कमी झाल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. तर मालेगाव बाहय मतदार संघात भाजपाचे थोडेफार वर्चस्व याठिकाणच्या मतांचा फायदा होणार आहे. तर धुळे शहरात एमआयएम चे आमदारांनी खुलेआम काँग्रेसचा प्रचार केल्याने या मतांच्या गोळाबेरीज केली असता काँग्रेस उमेदवाराला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र शिंदखेडा हा मतदार संघ गेल्या काही वर्षापासून भाजपचा बालेकिल्ला मानला जात आहे. तरी देखील याठिकाणी गेल्यावेळी ५७.५५ टक्क मतदान झाले होते पण यावेळी ५५.१३ टक्के मतदान झाल्याने भाजपाच्या मतांमध्ये घट झाली आहे. यावरून धुळे लोकसभा मतदार संघात भाजपाचे प्राबल्य असूनही मतदानाचा टक्का का घसरला यावर चिंतन करण्याचे गरज आहे.   
प्रमुख लढत असलेल्या कॉंग्रेस विरूद्ध भाजपच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे आता लक्ष लागले आहे. दोन्हीकडचे समर्थक विजय आपलाच असा दावा करत आहेत. धुळे लोकसभा मतदार संघात पाचव्या टप्प्यात निवडणूक घेण्यात आली. भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसर्‍यांदा उमेदवारी दिली. महाराष्ट्राच्या पहिल्याच यादीत भाजपने डॉ. भामरे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
त्यामुळे प्रचारासाठी डॉ. सुभाष भामरे यांना जवळपास दोन महिन्याचा कालावधी मिळाला. तर कॉंग्रेसने उमेदवार जाहीर करण्यास बराच वेळ घेतला कॉंग्रेसचा उमेदवार ठरवतांना झालेल्या विलंबामुळे कॉंग्रेस व महाविकास आघाडीचा प्रचार उशिरा सुरू झाला. मात्र कमी कालावधीत कॉंग्रेसने प्रचाराचा गॅप भरुन काढण्यात काही प्रमाणात यश मिळवल्याचे अखेरच्या टप्प्यात दिसले. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सभा घेतली, त्यासह शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्या सभा डॉ. शोभा बच्छाव यांच्यासाठी उपयोगी ठरल्याचे म्हटले जात आहे.
तर दुसरीकडे भाजपच्या डॉ. सुभाष भामरे यांच्यासाठी गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि योगी आदित्यनाथ यांची सभा महत्वाची ठरली. योगींच्या सभेला तर मालेगावात रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती, याचा ङ्गायदा भाजपला मालेगाव ग्रामीण तसेच बागलाण सटाणा भागात मताधिक्य वाढविण्यासाठी झाल्याचे म्हटले जात आहे. सोमवार दि.२० मे रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली.
सकाळीच अनेक मतदान केंद्रावर मोठ्या- मोठ्या रांगा लागल्या. कॉंग्रेससाठी मालेगाव शहरात मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याच्या बातम्या धुळे शहर आणि इतर भागात सोशल मीडियातून पसरल्या. अनेकांनी काही व्हिडीओ व्हायरल केले. आपल्याही रांगा लावा असे आवाहन करण्यात आले. त्याचा परिणाम धुळे शहरात दिसल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत.
धुळे शहर आणि धुळे ग्रामीण तसेच शिंदखेडा येथे भाजपसाठी पोषक वातावरण होते असेही दावे केले जात आहेत. तर मालेगाव शहरात, मालेगाव ग्रामीणमध्ये तसेच धुळे ग्रामीणमध्येही कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचा दावा कॉंग्रेसच्या गोटातून करण्यात येत आहे. मतदानाच्या आकडेवारीवरून विजयाचे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.
भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना गेल्या वेळी मिळालेल्या मतदानाचा आढावा घेवून यावेळी ही लिड मिळेल असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. तर कॉंग्रेसकडून मालेगाव शहर आणि इतर मतदार संघामधील मतदानाचा कल पाहून मोठया लिडने विजय मिळेल असा दावा करण्यात येत आहे. भाजप आपली सत्ता कायम राखून पुन्हा डॉ. भामरेंच्या विजयाची हॅट्रीक साजरी करणार की डॉ. शोभा बच्छाव चमत्कार करणार याचा निकाल दि.४ जूनला स्पष्ट होणार आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − thirteen =

Back to top button