खान्देश वार्ता-(धुळे)
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक दिवशीय दारू पिण्याचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येतो. विदेशी दारूसाठी पाच तर देशी दारूसाठी दोन रुपये परवाना शुल्क आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पिणाऱ्यांना परवान्याची मागणी करावी लागते.
मात्र हे परवाना बुक दारू विक्रीच्या दुकानांवर आणि बियरबार तसेच हॉटेलवर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे परवाना पावत्यांचा झोल काय हे समजायला मार्ग नाही. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोंबिंग ऑपरेशन सुद्धा राबविण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जेवणाच्या हॉटेलमध्ये सुद्धा विना परवाना दारूची बिना बोभाट विक्री सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्ह्यात कार्यरत आहे की, नाही अशी वास्तव परिस्थिती आहे. धुळे जिल्ह्यातून रस्त्यांच्या मार्गे मोठ्या प्रमाणात शासनाचा शुल्क बुडवून अवैधरित्या दारू तस्करी केली जाते. जिल्हा पोलीस दल एकीकडे कारवाई करताना दिसते. मात्र दारूबंदी विभाग आपली जबाबदारी असतानाही कारवाई करताना दिसून येत नाही.
बारा महिन्यातून एकदा कारवाई दाखविण्यासाठी हात भट्टी उध्वस्त केल्या जातात. या विभागातील अधिकाऱ्यांचे खबऱ्यांचे जाळे कमकुवत झाले आहे. वर्षभरात मोठी कामगिरी विभागाने केलेली नाही. त्यात आता एकदिवसीय परवाना ग्राहकांना पविण्यात येत आहे. एकेका ग्राहकाला पाच पाच परवाने माथी मारले जात आहेत. त्यामुळे एक दिवशीय परवान्यांचा झोल काय? याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.