खान्देश वार्ता-(धुळे)
निवडणूकीचा उत्सव अर्थात १८ वी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतदान प्रकिया सात टप्प्यात पार पडत आहे. राज्यातील पाचव्या टप्प्यात ०२-धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज सोमवार, दि.२० मे,रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस बंदोबस्त व राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण १७ हजार ३४१ मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयापासून रविवार सकाळी मतदान साहित्य घेवून अधिकारी, कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचले आले. आज सोमवार, दि. २० रोजी सकाळी ७ वाजेपासून सहा विधानसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात १८ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक मतदानासाठी पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रकिया पार पडणार आहे. जिल्ह्यात धुळे मतदार संघात १ हजार ९६९ मतदान केंद्रांवर संबधीत विधानसभा क्षेत्रनिहाय इव्हिएम, बॅलेट मशीन, व्हिव्हीपॅट, बॅटरी युनिट, मतदान कक्ष बॉक्स आदी मतदान साहित्यासह नेमून दिलेल्या एसटी बस, स्कूल बस वा अन्य नियोजित वाहनाने नियुक्त केलेल्या मतदान केंद्रांवर कर्मचारी पोहोचले आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात १ हजार ९६९ मतदान केंद्र….
धुळे लोकसभा मतदारसंघात १ हजार ९४८ मुळ मतदान केंद्र तर २१ सहाय्यकारी मतदान केंद्र असे एकूण १ हजार ९६९ मतदान केंद्र आहेत. त्यात धुळे ग्रामीण ३७५, धुळे शहर २८०, सहाय्यकारी मतदान केंद्र ८, शिंदखेडा ३३८, मालेगाव मध्य ३४३ सहाय्यकारी मतदान केंद्र २, मालेगाव बाहृय ३३७, सहाय्यकारी मतदान केंद्र ६, तर बागलाण विधानसभा मतदार संघात २८८ मतदान केंद्र सहाय्यकारी मतदान केंद्र ५ आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वितरीत करण्यात आले. ९८६ मतदान केंन्द्रावर वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच १३ मतदान केंद्र शॅडो मतदान केंद्र आहेत. याठिकाणी वॉकीटॉकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी १५३ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून १७ अतिरिक्त अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहे.
सहा मतदारसंघात २० लक्ष २२ हजार ६१ मतदार….
धुळे लोकसभा मतदार संघात एकूण २० लक्ष २२ हजार ६१ मतदार आहेत. त्यात धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात २ लाख ३ हजार ९३९ पुरुष मतदार तर १ लाख ८९ हजार ५५८ महिला मतदार व 1 तृतीयपंथी तसेच १ हजार ६७ सैनिक मतदार आहेत. तर धुळे शहर विधानसभा मतदार संघात १ लाख ७९ हजार ५६८ पुरुष मतदार तर १ लाख ६४ हजार २२६ महिला मतदार व २७ तृतीयपंथी तसेच ३३२ सैनिक मतदार आहेत. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात १ लाख ६९ हजार ६४८ पुरुष मतदार तर १ लाख ६२ हजार १९६ महिला मतदार व १ तृतीयपंथी तसेच ५३० सैनिक मतदार आहेत. मालेगांव मध्य विधानसभा मतदारसंघात १ लाख ५७ हजार ५१२ पुरुष मतदार तर १ लाख ४४ हजार ८७१ महिला मतदार तर ८ तृतीयपंथी तसेच ७५ सैनिक मतदार आहेत. मालेगांव बाहृय विधानसभा मतदारसंघात १ लाख ८९ हजार ४६८ पुरुष मतदार तर १ लाख ७१ हजार ३३९ महिला मतदार व ८ तृतीयपंथी तसेच ६८९ सैनिक मतदार आहेत.
तर बागलाण विधानसभा मतदारसंघात १ लाख ५१ हजार ७९३ पुरुष मतदार तर १ लाख ३७ हजार ८९६ महिला मतदार व २ तृतीयपंथी तसेच ५२१ सैनिक मतदार आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघात १२ हजार ७६ दिव्यांग मतदार असून या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच मदतीसाठी १ हजार ४८ स्वंयसेवकाची नियुक्ती केली आहे.
मतदान केंद्रांवर मोबाईलला बंदी……
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कार्डलेस फोन, वायरलेस सेटसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरास, बाळगण्यास निर्बंध आहेत. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल वापरता येणार नाही. त्यामुळे समूहाने मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना मोबाईल मतदान केंद्राच्या बाहेरच ठेऊन जावे लागणार आहे. किंवा एकमेकांजवळ सांभाळायला द्यावे लागणार आहे.
पोलीस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था…..
आज सोमवारी २० मे रोजी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुव्यवस्थितरित्या व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून देखील पुर्ण तयारी करण्यात आली आहे. यात प्रत्येक ईव्हीएम मशीन सोबत एक पोलीस आणि होमगार्ड तैनात आहेत. तसेच मतदान केंद्राच्या बाहेर १०० मिटर अंतरावर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याशिवाय बाहेरील कर्नाटक तसेच केरळ राज्यातून अतिरिक्त पोलीस कुमक बंदोबस्तासह मुंबई लोहमार्ग पोलीस बलासह अन्य जिल्ह्यातून देखील पोलीस व होमगार्डस पथक दाखल झाले आहेत. सर्व विधानसभा मतदार संघात पोलीस दलाचा रुटमार्च करण्यात आला आहे. क्रीटीकल व गर्दीच्या मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गृहभेटीद्वारे जनजागृती व मतदार चिठ्ठीचे वाटप……
या निवडणूकीत मतदानाचा टक्क वाढावा, याकरीता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी विशान नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाच्या सुचनांनुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागात तर धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागात अधिकारी, कर्मचारी यांनी गृहभेटीद्वारे नागरीकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली असून या मतदार संघात बीएलओ मार्फत १९ लाख १८ हजार ८३१ मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले असून ४ लाख ८० हजार ८७७ घरांना वोटर गाईडचे वाटप करण्यात आले आहे.
मतदानाच्या दिवशी देखरेखीसाठी वॉर रुमची व्यवस्था….
धुळे लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुमची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी मतदानाच्या दिवसाचे अहवाल, ईव्हीएमबाबतचे अहवाल, कंट्रोल रुम, मिडीया कंट्रोल रुम, मतदार समस्या निवारण कक्ष (१९५० टोल फ्री), आचारसंहिता कक्ष, वेब कास्टिंग, जीपीएस मॉनिटरिंग कंट्रोल रुम, सायबर सेल, तक्रार हाताळण्याची व्यवस्था (सी व्हीजील कक्ष) आदि तैनात ठेवण्यात आले आहे. याद्वारे संपूर्ण मतदार संघातील घडामोडींवर नजर ठेवण्यात येणार आहे.
१ हजार ८५३ गृह मतदान, अत्यावश्यक सेवा व इटीपीबीएमएस मतदारांनी केले मतदान
निवडणूक आयोगाने या निवडणूकीपासून प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार मतदार संघात ३९० गृह मतदार,१हजार २७५ अत्यावश्यक सेवेतील मतदार तर १८८ इटीपीबीएमएस असे एकूण १ हजार ८५३ मतदारांना आतापर्यंत मतदान केले आहे.
नागरिकांनी निर्भयपणे मतदानाला यावे
धुळे लोकसभा मतदार संघात आज दि.२० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे. प्रशासनातर्फे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या सोबतच जिल्ह्यात निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे. मतदारांनी लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन आपला हक्क बजवावा व मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.