(खान्देश वार्ता)-धुळे
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या मागील बाजूस सोमवारी दुपारच्या सुमारास १५ ते २० वर्ष जुनी फुलकेसर, काशीद, वारूड, गुलमोहर व सुळबाबुळ अशा एकूण नऊ निरनिराळ्या प्रकारच्या झाडांची कार्यालयातील चौकीदार कैलास रामदास आखाडे यांच्या सांगण्यावरून शासकीय कार्यालयाच्या आवारातील झाडांची कत्तल करून आपला आर्थिक फायदा करण्यासाठी विक्री करण्यात आली आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील चौकीदारच चोर आहे. असे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आल्याचे सामान्य प्रशासन विभागातील नायब तहसीलदार पंकज पाटील यांनी माहिती दिली आहे.
चौकीदार आखाडे यासह खाजगी इसम विजू गायकवाड व भीमराव शामराव ठाकरे यांनी संगनमताने झाडांची कत्तल करून ते परस्पर असरार शेख अस्लम यांनी टाटा कंपनीचे मालवाहू वाहन क्रमांक (एमएच१९एस/४१३७) या वाहनाने वाहतूक करून घेऊन जात असताना आढळून आले.
याबाबत संबंधितांची माहिती घेतली असता त्यानी विना परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यालयाच्या आवारातील झाडांची कत्तल केल्याप्रकरणी वनविभाग व महापालिकेला अहवाल सादर करण्यात आला आहे. तसेच वाहनासह कत्तल केलेली झाडे देखील जप्त करण्यात आली आहेत.
याप्रकरणी संबंधितांवर वन विभागाच्या विविध कलमानव्ये कठोर कारवाई करण्यात येईल. आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील चौकीदार कैलास आखाडे यांच्या वेतनातून सर्व भरपाई वसूल केली जाणार असल्याचेही नायब तहसीलदार पंकज पाटील यांनी सांगितले आहे.