राज्य सरकारने नेमकं मराठ्यांना फसवलं की, ओबीसींना.!
(खान्देश वार्ता)-धुळे
भाजप धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडायचे काम करीत आहे. भाजपचे हे रामराज्य नाही, तर रावणराज्य आहे. असा आरोप करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी काँग्रेस या रावण राज्याला उखडून फेकणार आहे. असा आशावाद धुळ्यात शनिवारी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्र विभागातील काँग्रेस पक्षाची जिल्हा निहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
धुळे शहरालगत गोंदूर येथील साईलक्ष्मी लॉन्स येथे काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक झाली. त्यावेळी पत्रकार परिषदेत संबंधित नेते बोलत होते. यावेळी विभागीय बैठकीसह पत्रकार परिषदेला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, धुळे जिल्हा प्रभारी शोभा बच्छाव, प्रभारी प्रदीप राव, प्रदेश कार्यकारिणी प्रणिती शिंदे, शिवाजीराव मोघे, माजी मंत्री के सी पाडवी, रमेश श्रीखंडे, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्यासह विविध नेते उपस्थित होते.
पुढे बोलतांना प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात निकाल देताना राज्य सरकारने नेमकं मराठ्यांना फसवलं की, ओबीसींना फसवलं.? हेच कळायला मार्ग नाही. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री जातात. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का जात नाहीत? आरक्षण देताना ओबीसींचा धक्का न लावता आरक्षण देऊ असे सांगितले होते.
मग आरक्षण कसे दिले. सरसकट आरक्षण देऊ असे सांगितले होते. मात्र ते सुद्धा दिले नाही. राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले की, ओबीसी समाजाला याचा खुलासा करावा. तसेच जनगणना करण्याची मागणी सुरुवातीपासून राहिली असून, एक फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात ५० टक्क्यांची मर्यादा तोडून सगळ्यांना न्याय द्यावा.
तसेच सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण द्यावे. ही आमची सुरुवातीपासून मागणी असून, यांनी नक्की कोणाला फसवले. याबाबतचा संभ्रम राज्यात कायम आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाची ही लढाई आज झालेली नसून या आधी चार वेळा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याआधी जे सांगितले तेच आता पुन्हा दिले आहे. यामुळे यांनी नक्की कुणाला फसवले याबाबत स्पष्टीकरण द्यावे, तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना संपवण्याचे काम भाजप सरकार करीत असून ते काँग्रेस खपवून घेणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी यावेळी दिला.
यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चैन्नथ यांनी सांगितले की, उल्हास पाटील यांना आम्हीच सस्पेंड केले आहे. भाजपशी हात मिळवणाऱ्यांना त्यांची जागा काँग्रेस दाखवीत आहे. काँग्रेसमध्ये असलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांना भाजप घेत आहे. असा टोलाही यावेळी चेन्नथ यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकारण धर्माच्या नावावर सुरू आहे धर्माच्या नावावर ते दोन गटांमध्ये विभाजन करीत आहेत. मात्र त्यांची ही गोष्ट काँग्रेस सहजासहजी होऊ देणार नाही.
मुळात सर्वधर्म समभाव या देशात आहे. पंतप्रधानांकडे केवळ राममंदिर आणि हिंदुत्व हेच मुद्दे आहेत. त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत. गरीबी बेरोजगारी आणि इतर सर्वच गोष्टींमध्ये भाजपाला अपयश आलेले आहे. त्यामुळेच भाजपाने ही रणनीती आखली आहे. परंतु काँग्रेस लोकसभा आणि विधानसभेसाठी मजबूत स्थितीत आलेला असून सगळ्याच गोष्टींमध्ये भाजपशी लढत देण्याचा निर्धारही करण्यात येणार आहे. काँग्रेसला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रेला मिळालेला पाठिंबा पाहता देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता यायला संधी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.