केंद्र सरकारच्या तुघलखी निर्णयाचा कडाडून विरोध करा.!
मा.आ.अनिल गोटेचा केंद्र सरकारवर साधक इशारा
(खान्देश वार्ता)-धुळे
केंद्र सरकारने ड्रायव्हरला ७ वर्षांच्या शिक्षेची, १० लाख रुपये दंडाची कायद्यात केलेली नवीन तरतूद तातडीने रद्द करावी. केंद्र सरकारच्या तुघलखी निर्णयांना कडाडून विरोध करावा. ट्रक ड्रायव्हर, मालकांच्या संपाला लोकसंग्रामचा सक्रीय पाठींबा आहे. मुघल काळात वेड्या महंमदाचे राज्य होते. असे लहानपणी पुस्तकात वाचले आहे. वेड्या महंमदच्या तुघलखी निर्णयाच्या असंख्य कथा ऐकल्या आहेत, पण त्याचा अनुभव नंतरच्या पिढीला कधी घेता आला नाही. अशी माहिती शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
मा. गोटे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या भाजपच्या दिल्लीतील सरकारांमधील निर्णयांमुळे मात्र आपल्या सगळ्यांना त्याचा पावलोपावली अनुभव येत आहे. केंद्र सरकारने काही कायद्यांमध्ये दुरूस्ती करून महंमद तुघलख कशा पध्दतीने राज्य करीत असावा याची चुणुक अनुभवायला मिळते आहे.
केंद्रात बसलेले स्वयंघोषीत तडीपार चाणक्य असे समजतात की, कुठलाही ड्रायव्हर हा जाणून-बूजून, समजून-उमजून अपघात घडून आणतो. अपघात या शब्दातच सर्व अर्थ सामावलेला आहे. एवढी किमान अक्कल अथवा एवढे किमान ज्ञान केंद्रातील नेत्यांना कोणी शिकवावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ड्रायव्हर कडून अपघात झाला तर त्याला ७ वर्षाची सक्त मजूरीची व १० लाखापर्यंत दंडाची शिक्षा नव्या कायद्यात सुचविण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षात एवढा बिनडोक निर्णय यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने घेतला नाही. अपघात हा अपघातच असतो. ठरवून केलेल्या घटनेला अपघात असे संबोधले जात नाही.
आजमितीस ड्रायव्हरला पगार मिळतो किती? त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करतो कसा? कामानिमित्ताने आपले वाहन घेऊन बाहेर गेला असेल तर त्याच्या कुटूंबातील सदस्यांना त्याच्या सहीसलामत येण्याची खात्री असत नाही.
गरीब कुटुंबातील तरूणांना रोजगार मिळत नाही. असे तरुण रिक्षा चालवणे, टॅक्सी चालवणे कोणाकडे तरी ड्रायव्हर म्हणून नोकरी करणे, अथवा ट्रक ड्रायव्हर, एस. टी. ड्रायव्हर अशा स्वरूपाच्या तृतीय, चतुर्थ श्रेणीच्या रोजगाराला प्राधान्य देतात. १० लाख रूपये भरण्याची क्षमता असेल तर असा तरूण कोणाकडे १०-१५ हजार रूपये महिन्यावर ड्रायव्हरची नोकरी करेल कशासाठी? फ्रान्सच्या राजाकडे उपासमारीस कंटाळून जनता भाकरी मागण्यासाठी आली तर फान्सचा राजा न्युरो फिडल वाजवीत बसला होता. तो म्हणाला, ‘खायला भाकरी नाही तर दुसरे काही चांगले जेवण करा’ अशी अवस्था आज केंद्रातील सरकारची झाली आहे. गरीबांना रोजगार द्यायचा नाही, अस्तित्वात असलेले रोजगार संपुष्टात आणायचे ही संरजामीवृत्ती देशांतील गरीबांचा जीव घेतल्या शिवाय थांबणार नाही. असे चित्र दिसत आहे.
एखाद्या ड्रायव्हरकडून अपघात होतो, त्यावेळेस तेथे ‘हौसे गौसे नवसे’ गोळा होतात. चूक कोणाची आहे याची शहानिशा न करता ड्रायव्हर वर हात सफाई करून घेतात. त्यामुळे जिवाच्या आकांताने सदर वाहनाचा ड्रायव्हर आपला जीव लपवून पळतो. अपघात स्थळी ड्रायव्हरने थांबणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्युला निमंत्रण देणे होय.
असे तुघलखी कायदे करून कष्टकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारी निर्णयाचा प्रत्येक भारतीयाने मनापासून निषेध केला पाहिजे. अशा सर्व ड्रायव्हर व मालक युनियनला लोकसंग्राम पाठींबा देत असून वेळ पडल्यास आणि आवश्यकता भासल्यास लोकसंग्रामचे कार्यकर्ते प्रत्यक्ष आंदोलनात उतरतील. असे पत्रक लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.अनिल गोटे यांनी बुधवारी प्रसिध्दीस दिले आहे.