(खान्देश वार्ता)-धुळे
एलसीबीच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत विनापरवाना गुंगीकारक औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या सुमारे 580 बाटल्या आणि 5 हजार 100 गुंगीकारक गोळ्या असा एकूण 1 लाख 3 हजार रुपयांच्या मुद्देमालासह चौघांना. बेळ्या ठोकल्या असून विनापरवाना गुंगीकारक औषधांची अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करणाऱ्या टोळीचा परदाफाश केला आहे.
मोहाडी परिसरातील दंडेवालाबाबा नगरात ऐका व्यक्तीने आपल्या घरात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकारक औषधांचे विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याची गुप्त बातमी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदेंना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहाडी परिसरातील दंडेवालाबाबा नगरात कारवाई करत विकास उर्फ विकी मोहन चौधरी याला अटक करून त्याच्याकडून गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व गोळ्या हस्तगत केल्या. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता यात अजून साथीदार असल्याची कबुली दिली. ही साखळी थेट मेडिकल व्यावसायीक पर्यंत जाऊन पोचली त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लूकेश अरुण चौधरी, प्रमोद अरुण येवले, आणि मुकेश आनंदा पाटील यांना अटक करून यांच्याकडून देखील गुंगीकारक औषधांचा मोठा साठा जप्त केला.
चारही आरोपींकडून सुमारे 580 गुंगीकारक औषधांच्या बाटल्या व 5 हजार 100 गोळ्या असा एकूण 1 लाख 03 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चौघांविरोधत मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, अमरजीत मोरे, संजय पाटील, दिलीप खोंडे, संदीप सगर, पंकज खैरमोडे, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, जितेंद्र वाघ, किशोर पाटील, योगेश जगताप, महेंद्र सपकाळ, कैलास महाजन व राजू गीते यांनी केली आहे.