(खान्देश वार्ता)-धुळे
शिरपूर शहर पोलिसांनी तालुक्यातील वाडी गावात सापळा रचून आयशर वाहनासह तब्बल ७९ लाखांच्या मद्यसाठा पकडला आहे. शिरपूर शहर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे शिरपूर पोलिसांचे कौतुक केले.
मध्यप्रदेशातील सेंधव्याहून बोराडी-वाडीमार्गे आयशर वाहन (आर.जे.१९/ जी.एच. ८४८२) मध्ये अवैध दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आसाराम आगरकर यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक आगरकर यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. यात पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरणार यांनी शोध पथकासह पथकासह वाडी गावाजवळ सापळा रचला. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास सदर संशयीत आयशर वाहन बोराडी गावाकडून वाडी गावाकडे येताना दिसले.
सदर वाहनाला थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबविता त्याने वाहन वळवून पुन्हा बोराडी गावाकडे वेगाने धाव घेतली. त्याचा संशय आल्याने पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे वाहनावरील चालकाने त्याचे वाहन शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाचे अलिकडे रस्त्यावर अंधारात उभे केले आणि अंधाराचा फायदा घेत पसार झाला. पथकाने बोराडी गावासह परिसरात त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. पथकाने सदर आयशर वाहनाची झडती घेतली असता त्यात प्लास्टीक गोण्यांमध्ये प्रत्येकी २ खोके व त्यात विदेशी दारुचा माल आढळून आला. सदर मालाला केवळ पंजाब राज्यात विक्रीसाठी परवानगी आहे.
तर दारू ही इतर राज्यात विक्री केला जात असल्याचे व या कटात सदर मालाचे मालक, खरेदीदार, पुरवठादार व वाहनाचे मालक सहभागी असल्याचे निदर्शनास आले. सदर मालावरील किंमत, बारकोड व बुचवरील बॅण्ड रोल खोडुन पुरावा नष्ट करून त्याची चोरटी वाहतूक केली जात होती. या कारवाईत ४९ लाख २१ हजार १८० रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा व ३० लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण ७९ लाख २१ हजार १८० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पो.ना. प्रमोद ईशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर वाहन क्र.(आर.जे. १९/ जी.एच.८४८२) वरील चालक तसेच सदर वाहनात मिळुन आलेल्या मालाचे मालक, खरेदीदार, पुरवठादार व वाहनाचे मालक (नाव गाव माहित नाही) अशांविरूध्द शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, संदिप दरवडे, हेमंत खैरणार, गणेश कुटे तसेच शोध पथकातील पथकाचे ललीत पाटील, प्रेमसिंग गिरासे, रविंद्र आखडमल, प्रमोद ईशी, योगेश दाभाडे आदींनी केली आहे.