खान्देश वार्ता-(धुळे)
शहरात जिममध्ये अधिक जोमाने व्यायाम करण्यासाठी मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनचा वापर करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दि.११ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करायला सात दिवसांचा कालावधी लागला.
गुन्हा दाखल करण्यासाठी एवढे सात दिवस का लागले असावेत, त्यामागील नेमकं गौडबंगाल काय विषयी उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सेक्स पॉवर वाढवण्यासाठी आणि जिममध्ये अधिक जोमाने व्यायाम करण्यासाठी मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनचा वापर होतो.
ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे शहरातील तरूण पीढी गर्तेत ओढली गेल्याची व अधिक ओढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या दिवशी कारवाई केली त्याच दिवशी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही. सात दिवसांनी हा गुन्हा दाखल करण्याबाबत “प्रकाश” कसा काय पडला. जिम चालकाकडून या बदल्यात शारीरिक ऐवजी आर्थिक क्षमता वाढवत त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी सवड दिली असल्याची चर्चा जोर धरून आहे.
त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. सात दिवस विलंबाचे कारण काय, कोणामुळे एवढी सवड मिळाली. हे सर्व प्रकाशात आणण्याची आवश्यकता आहे. नाही तर दलातील दलालांमुळे धुळ्याचे उडता पंजाब झाल्याशिवाय राहणार नाही. ही बाब प्रकर्षाणे घेत या प्रकरणावर नेमका ‘प्रकाश’ टाकावा, अशी मागणी जोर धरून आहे.