(खान्देश वार्ता)-धुळे
नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचा व्यवसाय करावयाची परवानगीसाठी २१ हजाराची लाच मागून १० हजाराची लाच स्वीकारताना सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलीस वाहनांवरील चालकाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदार यांना नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त दारू वाहतुकीचा व्यवसाय करावयाचा असल्याने सारंगखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक संदिप उत्तमराव पाटील यांनी २१ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती १० हजार रुपयांची मागणी करीत लाचेची रक्कम स्वीकारताना पोलीस वाहनावरील चालक गणेश भामट्या गावित याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप पाटील व चालक गणेश गावित यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे व पथकातील सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी यांनी केली आहे.