(खान्देश वार्ता)-धुळे
समाजाने निर्भय, करारी साने गुरुजींचेही स्मरण करायला हवे, असे आवाहन डॉ. चैत्रा रेडकर यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी, अलक्षित साने गुरुजी या विषयावर परिसंवाद झाला. त्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. डॉ. चैत्रा रेडकर म्हणाल्या, की साने गुरुजी राजकीय संघटनेचे सदस्य होते, त्या संघटनेलाच ते प्रश्न विचारायचे. त्यांनी राजकीय गुलामगिरी स्वीकारली नाही. तळागाळातील दृष्टीकोन ते मांडत राहिले.
डॉ.परमानंद बावनकुळे म्हणाले, की अलक्षित म्हणजे दुर्लक्षित. लेखक, संत, स्वातंत्र्यसैनिक व समाजसेवक या तीन भागात साने गुरुजींची विभागणी होते. पण त्यांच्यातील लेखकाने इतर दोन भागांवर कुरघोडी केली. त्यामुळे बाकीचे भाग दुर्लक्षित राहिले. शांत, संयमी, संस्कारशील लेखक म्हणून साने गुरुजी आपल्यासमोर उभे राहत असले तरी त्यांचा पिंड पीडितांना न्याय मिळवून देणारा होता. वरून शांत भासणारे साने गुरुजी प्रत्यक्षात क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांच्यामुळे मंदिरे इतरांसाठी खुली झालीत.
प्रा. प्रकाश पाठक म्हणाले, की साने गुरुजींनी मातृधर्माला कुटुंबधर्माची जोड दिली. ममत्व, समत्व हा त्यांच्या जीवनाचा गाभा होता. समता व स्वातंत्र्याला त्यांनी बंधुत्वाशी जोडले.
डॉ. मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या, की धुळे, नाशिक, येरवडा या तुरुंगांमध्ये साने गुरुजींनी कारावास भोगला. या कालावधीत त्यांनी साहित्य लिहिले. जे पटले नाही ते त्यांनी कधीच केले नाही. त्यांच्या जीवनाचं पहिलं पर्व बालपण, तिथेच त्यांच्यावरील संस्कारांचे बीज रोवले गेले, असे सांगितले. डॉ. ललित अधाने, प्रा. लक्ष्मण सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. संदीप नेरकर यांनी केले.