(खान्देश वार्ता)-धुळे
आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील रोषमाळ आदित्य विजय ब्राह्मणे या बारा वर्षाच्या बालकाने नदी पत्रात बुडणाऱ्या दोन बालकांना वाचवण्यासाठी यांना मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार सोमवार (दि.२२)रोजी आदित्य चा लहान भाऊ आरुष ब्राह्मणे याने स्वीकारला. आदित्य याने आपल्या मामे भावांचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला होता. यामुळे राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
आदित्य आणि त्याचे दोन मामेभाऊ (दि.१९) मे २०२३ रोजी शहादा तालुक्यातील वाके गावातील दरा नदीच्या किनाऱ्याजवळ खेळत होते. खेळताना त्याचा मामेभाऊ पाण्यात बुडू लागला. हे पाहून आदित्यने धोका असलेला उतार लक्षात न घेता खोल पाण्यात उतरून आपल्या मामे भावांना वाचवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, आदित्य खूप खोल गेला, त्यामुळे त्याला लगेच शोधणे कठीण झाले. आदित्यचा प्रयत्न व्यर्थ गेला. आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. तर सुदैवाने दोन्ही मामे भावांचा जीव वाचला. मात्र, कठीण प्रसंगात आदित्य ने आपले अतुलनीय शौर्य दाखविले. त्याच्या या शौर्यपूर्ण प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. आदित्य ब्राह्मणे यांनी आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. हा त्याचा शौर्यपूर्ण प्रयत्न आहे. या प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोमवार (दि.२२)रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देण्यात आला. आदित्यचे वडील विजय ब्राह्मणे हे धडगाव माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. त्याना दोन मुले आहेत. आदित्य सर्वात मोठा होता. आदित्यला मरणोत्तर पुरस्कार मिळाल्याने वडिलांचे डोळे पाणावले होते. आदित्यला पुरस्कार मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी यांच्यासह इतरांनी प्रयत्न केल्याचेही वडील विजय ब्राह्मणे यांनी माहिती देताना सांगितले.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार असामान्य क्षमता आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र दिले जाते.
यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी देशातील १८ जिल्ह्यांमधून असामान्य कामगिरी करणाऱ्या १९ मुलांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ जानेवारी रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही ही मुले सहभागी होतील.
निवड झालेल्या मुलांच्या यादीमध्ये शौर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये प्रत्येकी एका मुलाचा तर समाजसेवेच्या श्रेणीत चार मुलांचा; क्रीडा प्रकारात पाच आणि कला आणि संस्कृती श्रेणीत सात मुलांचा समावेश आहे. या यादीत १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे.