(खान्देश वार्ता)- धुळे
शहरातील देवपूर बस स्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेडखानी करण्याच्या उद्देशाने सोशलमीडियावर आक्षेपार्ह रील्स बनवणाऱ्या रोमियोला पोलिसांनी शोधून काढत त्याची चांगलीच नशा उतरली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून चांगलेच कौतुक केले जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यामांवर धुळे शहरातील देवपूर बसस्थानक आवारात एक तरुण शालेय विद्यार्थिनीसमोर आक्षेपार्ह गाण्यांवर नाचून गाणे म्हणतांनाचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत पोलीस प्रशासनाने तात्काळ याचे गांभीर्य लक्षात घेत संशयित तरुणाचा शोध घेतला आहे. सोमवारी सकाळी शिंदखेडा तालुक्यातील नरडाणाजवळ व्हिडीओतील तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
संबधित तरुण हा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असून तो शिक्षणासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विटाई गावात राहत असून त्याचे नाव राज हिम्मत पवार (वय २१) असल्याचे समोर आले असून संबधित तरुण महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी व्हिडियो प्रसारित झालेल्या ठिकाणी देवपूर बस स्टँड येथे संबधित तरुणास आणून विद्यार्थिनींससमोर कान पकडून माफी मागायला लावत समज देण्यात आली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश घोटेकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे, मच्छिंद्र पाटील, पंकज चव्हाण, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, जितेंद्र वाघ यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.