क्राईमनंदुरबार

शहादामध्ये शेतात काम करणाऱ्या तरुणीच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू

(खान्देश वार्ता)- धुळे
गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात रविवारी दुपारी विजेच्या कडकडाट सोबत पावसाने चांगलीच हजेरी लावली. मात्र यामुळे शहादा तालुक्यातील बोरद येथे शेतात काम करीत असलेल्या युवतीच्या अंगावर वीज पडून ठार झाल्याची घटना घडली आहे.
हवामान खात्याने दोन दिवस पाऊस राहाणार असा अंदाज वर्तवला होता. त्याच अनुषंगाने शेतकरी शेतात तयार झालेला कापुस व इतर पिक काढण्याची लगबग करीत असताना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरु झाला आणि काही वेळातच पावसाने हजेरी लावली. पाऊस येणार असल्याने काढलेला कापुस झाकण्यासाठी ताडपत्रीची व्यवस्था करण्यात आली होती.
याचवेळी बोरद येथे दुपारच्या सुमारास सपना राजेंद्र ठाकरे (वय १८) ही शेतात काम करीत होती. काम करीत असतांना विजेचा कडकडाट सुरु असताना अचानक तिच्या अंगावर वीज पडली. त्यात पूर्णतः भाजली गेल्याने जागेवरच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची म्हसावद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा करण्याचे आदेश देऊन शासनाकडे अहवाल पाठविण्यात येईल असे सांगितले आहे.
दरम्यान नंदुरबार जिल्हा पालकमंत्री अनिल भाईदास पाटील यांनी तहसीलदाराशी संपर्क साधून घटनेची विचारपूस करून मयत युवतीच्या नातेवाईकांना शासकीय मदत म्हणून देण्याचे लवकर प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तर मयत सपना ठाकरे हिचे शहादा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
– शहादा तालुक्यात पावसामुळे यात्रोत्सवात भाविकांनी फिरवली पाठ..
शहादा तालुक्यातील उंटावद येथील रविवारी रोकडमल हनुमानची एक दिवसाची यात्रा मोठ्या उत्साहाने भरली होती. मात्र अचानक आलेल्या बेमोसमी पावसामुळे यात्रेच्या ठिकाणी मंदिर परिसरात लावलेल्या हॉटेल्स रसवंतीगृहे महिला सौंदर्य प्रसाधने खेळणीच्या दुकानांसह विविध व्यवसायिकांची तारांबळ उडून आपले साहित्य वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली. अनेकांचे साहित्य ओले झाले होते. तर पावसामुळे दुपारी तीन वाजेनंतर भाविकांनी पावसामुळे दर्शनाकडे पाठ फिरवली होती.
Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − eleven =

Back to top button