खान्देश वार्ता-(धुळे)
तालुक्यातील वडणे या गावात (दि.६) फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घराचे छत पडून बाप व एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला होता. याबाबत प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर वृत्त प्रकाशित झाले होते. ही बातमी पारोळा येथील पत्रकार अभय पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल करीत पीडित कुटूंबाला मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार पारोळा येथील वॉट्सअप गृपच्या माध्यमातून तब्बल पन्नास हजार रुपयांची मदत वडणे येथील पीडित कुटूंबाला देण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार अभय पाटील, प्रा. जे. बी. पाटील, प्रा. किरण अहिरराव, डॉ. रवींद्र निकम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्दैवी घटनेत एकाच कुटूंबातील पाच सदस्य मध्यरात्री घराच्या छताच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले होते. यात कुटूंब प्रमुख प्रवीण पाटील व त्यांचा एकुलता एक मुलगा गणेश पाटील जागीच ठार झाले होते. तर पत्नी प्रेरणा पाटील व हेमांगी पाटील व भूमी पाटील या दोघी मुली या घटनेत सुदैवाने बचावल्या आहेत.
मात्र या कुटूंबाचा प्रमुख आधारवड व एकुलता एक मुलगा मयत झाल्याने या सर्वसाधारण कुटूंबावर वाईट प्रसंग आला आहे. याच दुर्दैवी घटनेची दखल घेत पारोळा येतील दात्यांनी तब्बल पन्नास हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. या विधायक कामासाठी पारोळा येथील दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार अभय पाटील यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी विनय गोसावी (धारावी), एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीष गायकवाड यांनी पुढाकार घेत ही मदत केली आहे.
यापूर्वी देखील या दैनिक दिव्य मराठी गृप पारोळा यांच्यावतीने कोरोना काळात आगग्रस्त व एखाद्या कुटूंबावर आलेल्या अचानक घटनेतही या गृपमधील सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. थेट जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील वॉट्सअप गृपच्या माध्यमातून एका सर्वसाधारण कुटूंबाला महत्वपूर्ण वेळेला ही मदत मिळाल्याने ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.