(खान्देश वार्ता)-धुळे
मुंबई-आग्रा महामार्गावर कापूस व्यापाऱ्याला बेदम मारहाण करत व्यापाऱ्याकडून ७ लाख रुपये हिसकावून पसार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीला धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने शिताफीने अटक करून लुटितील २ लाख ६१ हजार च्या रोकडसह गुन्ह्यात वापरलेले १ गावठी बनावटीचे पिस्तूल, ३ दुचाकी, आणि मोबाईल असा एकूण ५ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. महामार्गावर लूटमार करणाऱ्या या टोळीतील ७ आरीपिंना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे,
दि.२७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास धुळे कडून आर्वी येथे रोकड घेऊन जाणाऱ्या कापूस व्यापारी हितेश शंकर पाटील व त्यांच्या मित्राला मागून येणाऱ्या ४ दुचाकी स्वारांनी त्यांची दुचाकी अडवत बेदम मारहाण करून त्यांच्या जवळ असलेल्या पिशवी मधील ७ लाख रुपये हिसकावून पोबारा केला होता. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह शोध पथकाच्या टीमने घटनास्थळी धाव घेत दरोडेखोरांच्या टोळीचा शोध सुरू केला यासंदर्भात कापूस व्यापारी हितेश पाटील यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता,
तालुका पोलिसांनी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्ह्याच्या तपासाचे चक्रे वेगाने फिरवत. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यां दोघांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरून आरोपी उज्जैन गायकवाड (रा.जुंनेर), दादू सोनवणे (रा.मोरशेवडी), राहुल सूर्यवंशी (रा.चितोड), गोकुळ अहिरे (रा.चितोड),बादल मोरे (रा.बल्हाने),अनिल सोनवणे (रा.दिवाणमळा), प्रकाश सोनवणे (रा.दिवाणमळा) तालुका धुळे अश्या ७ आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी २ लाख ६१ हजार १०० रुपये रोकड सह गुन्ह्यात वापरलेल्या ३ दुचाकी, १ गावठी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुस, तसेच फिर्यादी व आरोपी याच्या जवडील मोबाईल असा एकूण ५ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लुटलेल्या पैशांचे केले समान हिस्से…
सदर दरोडेखोरांच्या टोळीत १२ ते १३ आरोपींचा समावेश असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामूळे आरोपी वाढण्याची शक्यता असून इतर देखील गुन्हे उघडतीस येणार आहेत.या दरोडेखोरांनी कापूस व्यापाऱ्याचे लुटलेल्या पैशांचे समान हिस्से करत आपापसात वाटून घेतले असल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. तर काही आरोपींनी आपल्या हिष्यातल्या रकमेतून मोबाईल व इतर सामानाची खरेदी केल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे इतर फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करून उर्वरित रक्कम हस्तगत करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रस्ता लूट करणाऱ्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी ४८ तासांत अटक करून गुन्हा उघड केल्याने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कौतुक केले आहे. तसेच जिल्ह्यातील व्यापारी यांनी देखील मोठी रक्कम प्रवास करून घेऊन जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह शोध पथकातील कर्मचारी नितीन चव्हाण, किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, मुकेश पवार, विशाल पाटील, राजू पवार, कुणाल शिंगाने, राहुल देवरे यांचा या उत्कृष्ट कामगिरीत समावेश आहे.