खान्देश वार्ता-(धुळे)
धुळे तालुका पोलिसांनी दिव- दमण येथुन शहादा, नंदुरबारकडे होणारी विदेशी मद्याची तस्करी रोखण्यात यश मिळविले. कारवाईत चौघे संशयित, विदेशी मद्य व दोन वाहनांसह सुमारे आठ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान वाहन चालकांनी पथकातील कर्मचार्यांच्या अंगावर वाहन पळवून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अशाही परिस्थितीत पथकाने जीवाची बाजी लावून सदरची कारवाई केल्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी माहिती देतांना सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देशी-विदेशी मद्यासह अंमली पदार्थांची होणारी तस्करी तसेच घातक शस्त्रांचा बेकायदेशिररित्या होणार्या वापरावर प्रतिबंध बसावा याकरीता धुळे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे प्रभारी, अधिकार्यांना कडक कारवाईच्या सुचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोनि अभिषेक पाटील यांनी सहकार्यांना सतर्क केले होते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना दमण दिव कडून शहादा, नंदुरबार शहराकडे महिंद्रा टीयुव्ही (जीजे१५/सीएफ२७४२) व इतर एक अशा दोन वाहनांमधून विदेशी मद्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देत पथकाची निर्मिती केली व पथकास कारवाईच्या सुचना केल्या. त्यानुसार पथकाने महामार्गावर सापळा रचला. यावेळी संशयित वाहने पथकास येतांना दिसली. पथकाने वरील क्रमांकाच्या चालकास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने थेट पथकातील कर्मचार्यांच्या अंगावर वाहन नेवून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र अशा परिस्थितीत पथकाने जीवाची पर्वा न करता दोन्ही वाहनांना थांबवून चौघांना ताब्यात घेण्यात यश मिळविले. या वाहनांच्या तपासणीत सहा लाख रूपये किंमतीचा विदेशी मद्याचा साठा पथकाच्या हाती लागला. या कारवाईत विदेशी मद्यसाठ्यासह दोन वाहने मिळून एकूण आठ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.
याप्रकरणी जयेश शैलेश डामरे (रा.सर्वोदय सोसायटी, वृंदावन अपार्टमेंट तिन बत्ती दमन), गणेश विलास सोनवणे (रा.दिलीप नगर नारायण पार्क दमन), निलेशकुमार सदगुनभाई हरीजन (रा.झापाबार धाकली निवाडी, प्रविणभाई चाळ,दमन), हार्दीक शैलेश ओड ( रा.मशाल चौक, दिपांजली अपार्टमेंट, दमन), यांचेवर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील व पथकातील किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, धिरज सांगळे, चालक महेंद्र पाटील या पथकाने केली आहे.