खान्देश वार्ता-(धुळे)
शासकीय अधिकारी व तस्करांचे मिळून संघटित गुन्हेगारी वाढले आहे. असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून धुळ्यातील जीएसटी प्रकरण व नाशिक मधील अंमली पदार्थ तस्कर प्रकरणी मोक्का लावण्यात यावा याबाबत चौकशीसाठी एसआयटी स्थापन करून तपास ईडीकडे सोपवण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
मा.आ.गोटे यांनी म्हटले आहे की, प्रत्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी शासकीय वाहनांचा बेकायदेशीर वापर करून जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करून खंडणी गोळा केली. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झाले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. अशा व्यवहारातून संबंधितांनी बेनामी संपत्ती गोळा केली आहे.
पोलिसांच्या खाकी वर्दीचा तसेच शासकीय वाहनांचा गैरवापर करून संबंधितांनी हे उद्योग केले आहेत. त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चोर लुटांची गुन्हेगारी टोळी तयार करून महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून दररोज लाखो रुपये गोळा करत असतील. पोलीस खात्याच्या स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दररोज किमान ५० ते १०० वाहनधारकांकडून अशा पद्धतीने खंडणी गोळा करण्याचा कोठा ठरवून दिला होता. ही संघटित गुन्हेगारी आहे.
तसेच अंमली पदार्थ तस्करीचे प्रकरण यापेक्षाही गंभीर आहे. ज्या भागात अमली पदार्थांचा कारखाना होता त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांनाही चौकशीच्या फेऱ्यात घेतले पाहिजे. अशा गंभीर गुन्ह्याचा तपास मोक्का कायद्याअंतर्गत ईडी सारख्या तपास यंत्रणे कडून झाला पाहिजे. अन्यथा आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी आणि ईडीचे अधिकारी, केंद्रीय आपत्कालीन कार्यालयाचे अधिकारी, आयकर अधिकारी यांची एसआयटी स्थापन करून तपास केल्यास गुन्हेगारांना वचक बसेल असेही गोटे यांनी म्हटले आहे.