(खान्देश वार्ता)-धुळे
जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकास प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्यमान कार्ड वितरीत करण्यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालये, रेशन दुकाने, प्रमुख धार्मिकस्थळे, सहकारी संस्था याठिकाणी विशेष शिबिरांचे आयेाजन करावे. अशा सूचना आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भारत, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधा व सेवा संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दत्ता देगांवकर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविकांचे प्रतिनिधी, सीएससी सेंटरचे प्रतिनिधी यांचेसह या योजनांच्या पॅनलवरील रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्यात आयुष्मान भारत कार्डचे १५ लाख ३८ हजार ४०१ लाभार्थी असुन त्यापैकी ६ लाख ९२ हजार ६८२ कार्डाचे वितरण झाले आहे. धुळे जिल्हा राज्यात हे कार्ड वितरणात ९ व्या क्रमांकावर आहे. उर्वरित नागरीकांचे आयुष्मान कार्डचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी शासकीय, खाजगी दवाखान्यात, सार्वजनिक वितरण प्रणाली तसेच महत्वांच्या धार्मिकस्थळी तसेच सहकारी संस्थेच्या ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावेत.
यासाठी सर्व डाटा एन्ट़्रीधारकांना सूचना द्याव्यात. रेशन दुकानदारांना कार्ड काढण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावेत. कॉमन सर्व्हिस सेंटरची संख्या वाढविण्यात यावी. आयुष्यमान भारत तसेच महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनाच्या सेवा देणाऱ्या नविन रुग्णालयांची संख्या वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. आरोग्य मित्रांची संख्या वाढविण्यात यावी. रुग्णांना आवश्यक सेवा न देणाऱ्या रुग्णालयाचे नाव पॅनलमधून कमी करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. याचबरोबर विविध उपचाराच्या खर्चाची प्रतिपुर्तीच्या दरात वाढ करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर आदिवासी भागात नागरीकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी दुर्गम भागातील एक ग्रामीण रुग्णालय व एक प्राथमिक आरोग्य केंद्र सामाजिक संस्थांकडे आरोग्य सेवा पुरविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव सादर करावा. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातंर्गत माहिती उपलब्ध होण्यासाठी संकेतस्थळ तयार करण्याचा प्रस्ताव सादर करावा. आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतंर्गत पॅनलवरील रुग्णालयाच्या प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी डॉ. शेटे यांच्यासमोर मांडल्या त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल असे डॉ. शेटे यांनी सांगितले.