खान्देश वार्ता-(धुळे)
लग्न समारंभातून परतताना शहादा तालुक्यातील टूकी येथील बस स्थानकाजवळ तीन बैलांची सुरू असलेल्या झुंजी दरम्यान यातील एक बैल बिथरला आणि तो झुंजीमुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या कारचा काच फोडून थेट वाहनात शिरला. यावेळी वाहनात बसलेले पाचही जणांनी बैलाचा हा थरार अनुभवला. मात्र सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नसल्याने सर्वजण सुखरूप आहेत. या घटनेने मात्र परिसरात “देव तारी त्याला कोण मारी” काहीस असेच घडले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
शहादा तालुक्यातील दामळदा येथील उपसरपंच डॉ. विजय नामदेव चौधरी, विद्याबाई विजय चौधरी, लताबाई भरत पाटील, रीताबाई प्रकाश पाटील, कृष्णा ठाणसिंग गिरासे असेही जण कार क्रमांक (जीजे१९ एम/५१५४) ने शहादा येथील एका लग्न समारंभ आटपून दुपारच्या सुमारास परत येत असताना टूकी गावाच्या बस स्थानकाशेजारी तीन बैलांची झुंज सुरू असल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले.
मात्र काही क्षणातच तिघांपैकी दोघे बैल कारच्या बाजूने पळत सुटले. तर त्यातील एक बैल थेट कारच्या काचेवर जाऊन आदळला व काच फोडून आत शिरला. डॉ. विजय चौधरी वाहन चालवत होते. तर त्यांच्या बाजूला कृष्णा गिरासे यांच्या अंगावर काच फोडत बैल आदळला आणि बैल गाडीतच अडकल्याने वाहनातील पाचही जणांनी तात्काळ वाहनाच्या बाहेर सुटका करून घेतली. कारमधील सर्वांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. मात्र सर्वजण सुखरूप आहेत. यावेळी दामळदा, टुकी, जोवखेडासह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.