खान्देश वार्ता-(धुळे)
जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक मेघश्याम बोरसे यांना ५० हजारांची लाच घेतांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य यांनी आपल्या वार्डातील उर्दू शाळेमध्ये संरक्षण भिंत, शाळेच्या आवारात पेव्हर ब्लॉक आणि विद्यार्थ्यांसाठी सुलभ शौचालय बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. अनेकदा बोरसे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतरही विकास काम मंजूर केलं जात नव्हतं. दरम्यान अंदाजपत्रिकेत १२ लाख रुपये किमतीच्या कामाच्या बदल्यात २० टक्क्याप्रमाणे दोन लाख ४० हजार रुपये काम घेणाऱ्या इच्छुक ठेकेदाराकडून आगाऊ कमिशन घेऊन द्यावे लागेल अशी मागणी बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती.
तडजोडीअंती दोन लाख रुपयांमध्ये हा सौदा ठरला होता. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य महिला आणि तिच्या नवऱ्यानं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली. याप्रमाणे सापळा रचत आज लाचेचा पहिला हप्ता ५० हजार रुपये स्वीकारत असताना मेघशाम बोरसे यांना म्हसदी ग्रामपंचायत कार्यालयातून रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. बोरसे यांच्याविरुद्ध साक्री पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( गावरान कोंबडीवर ताव मारण्याची होती सवय..!)
आतापर्यंत ग्रामसेवक मेघशाम बोरसे यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा दिली आहे. त्या ठिकाणी अर्थपूर्ण व्यवहारासह गावरान कोंबडीवर ताव मारून कामे मार्गी लावण्याची पध्दत त्यांची होती. जर गावरानी कोंबडीचा ताव मारला नाही तर जास्तीचे आर्थिक वजन संबंधिताला जास्तीचे ठेवावे लागत होते. अशी माहिती ग्रामसेवक बोरसे यांनी सेवा दिलेल्या गावातील लोकांनी माहिती देताना सांगितले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रविण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे.