(खान्देश वार्ता)-धुळे
जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बांदल यांनी कारागृहात राबविलेल्या अभिनव उपक्रमातून शिक्षा भोगत असलेल्या काही कैद्यांनी आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या आहेत. या कलेचे दालन कारागृहात सुरु करण्यात आले असून जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते या गणेश मूर्ती प्रदर्शन दालनाचे उद्घाटन झाले.
धुळे जिल्हा कारागृहात विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी फुलाराम नवरामजी मेघवाड याने प्रशिक्षण घेवून नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असताना उत्कृष्ट गणेश मूर्ती साकारल्या होत्या. त्यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता.
फुलाराम मेघवाड हा सध्या धुळे जिल्हा कारागृहात आहे. त्याने याबाबत कारागृह अधीक्षक विशाल बांदल यांच्याशी चर्चा केली. कारागृहातील इतर सहकारी कैद्यांच्या मदतीने आपण मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती साकारुन त्यांची ना नफा न तोटा या तत्वावर विक्री केल्यास एक अभिनव उपक्रम साकारला जाईल आणि कारागृहातील कैद्यांनाही काहीतरी वेगळे काम केल्याचा आनंद होईल, अशी भावना बोलुन दाखवली. त्यास अधीक्षक बांदल यांनी उस्फूर्त प्रतिसाद देवून गणेश मूर्ती साकारण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करुन दिले. तसेच यासाठी कारागृहातील शिपाई सूर्यकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
मेघवाड याने इतर कैद्यांना गणेशमूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार, बंदिवान गोपाळ माधव गायकवाड, विलास लक्ष्मण कोळी, सोपान रघुनाथ काशीद, हरीष धिरूभाई पटेल यांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कला शिकून त्यांनी पर्यावरणपूरक आकर्षक गणेश मूर्ती साकारल्या आहेत.
गणेश मूर्ती विक्री व प्रदर्शन दालनाचे उद्घाटन मंगळवार (दि.१२) जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारागृह अधीक्षक विशाल बांदल, तुरुंगाधिकारी सचिन झिंजुर्डे, फादर विल्सन रॉड्रीग्ज, रक्षक सूर्यकांत पाटील, उदय सोनवणे, कैलास चौधरी, कमलाकर दुसाने, अनिल बोलकर, बाळू चव्हाण, विलास खलाणे, भदाणे, सुभेदार पांडुरंग चौरे, भगवान सरदार, विकास खलाणे आदी उपस्थित होते.
या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, जिल्हा कारागृहाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगला उपक्रम राबविला आहे. कैद्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा कौतूकास्पद प्रयत्न आहे, शिक्षा भोगून झाल्यावर या प्रशिक्षणाचा कैद्यांच्या रोजगारासाठी उपयोग होवू शकेल, त्यामुळे अशाप्रकारे उपक्रम राबवून कैद्यांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल, यासाठी अधीक्षक बांदल यांनी केलेले प्रयत्न कौतूकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले. तसेच मूर्ती साकरणाऱ्या कैद्यांचा सत्कार करण्यात आला. उपक्रमासाठी परिश्रम घेणारे कारागृह शिपाई सूर्यकांत पाटील यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.