(खान्देश वार्ता)-धुळे
राज्यात कायद्यान्वये बंदी असलेला गुटख्याचा साठा विनापरवानगी वाहतूक करून धुळे जिल्ह्यात येत असल्याची टिप सोनगीर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कंटेनर पकडला असून, साडेसहा लाखांचा गुटखा जप्त केला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आगमनापासून अवैध व्यवसायावर कारवाईची मोहिम चालू झाली आहे. सहा डिसेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलले अपायकारक पानमसाला व गुटख्याचा कंटेनरमध्ये क्र.(एमएच०४ केयु५४४८) महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याचे उद्देशाने दिल्लीकडून धुळ्याकडे येत आहे, अशी बातमी सोनगीर पोलीसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी हे सोनगीर टोल नाक्याजवळ जाऊन थांबले. सोनगीर टोलनाक्यावर वाहन थांबवुन सदर गाडीची तपासणी केली. त्यात राजनिवास, विमल, राजश्री, झेड एल-०१ पानमसाला व तंबाखूच्या गोण्या भरलेले ३२ बॉक्स मिळुन आले. सदर वाहनावर कारवाई केली असून सदर कारवाईत सुमारे सहा लाख ६१ हजार ३२० रुपये किंमतीचा पानमसाला (गुटखा) व १५ लाख रुपये किंमतीचा कंटेनर असा एकूण २१ लाख ६१ हजार ३२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर वाहनावरील चालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी यांना माहिती देण्यात येवुन गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, सहायक पोलीस उपनिरीक्षक किरण राजपूत, नरेंद्रसिंग गिरासे, संजय देवरे, अमरीश सानप, राहुल पाटील, विजयसिंग पाटील यांनी केली आहे.