खान्देश वार्ता-(धुळे)
मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला मैत्रिणीच्या वडिलांसह नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर एकाचा शोध सुरू आहे.
राजेंद्र दगडू भवरे (रा.जैताणे ता. साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवार दि.१८ रोजी सकाळच्या सुमारास निजामपूर पोलिसांनी तुमचा मुलगा अभय राजेंद्र भवरे (वय२०) याला धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोच्च रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले. त्यानुसार मी पत्नी व नातेवाईक रुग्णालयात गेलो असता तो शुद्धीवर असताना मुलगा अजय यांनी घडलेला सगळा वृत्तांत कथन केला.
यावेळी त्यांनी सांगितले की, दि.१७सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मैत्रिणीने मला रात्री भेटायला ये असा निरोप दिला. त्यानुसार मी दि.१८ रोजी पहाटेच्या साडेतीन वाजेच्या सुमारास जैताणे येथील राहत्या घरून निघून मैत्रिणीच्या बिरोबा मंदिराच्या बाजूला राहत्या घरी मागच्या दरवाजाने गेलो. मागच्या खोलीत गप्पा मारीत असताना मैत्रिणीच्या वडिलांना व भावाला आवाजाची चाहूल लागल्याने ते मागच्या खोलीत आले.
त्यामुळे घाबरून त्या ठिकाणाहून मी उठलो मैत्रिणीच्या वडिलांनी हात पकडून माझे नाव पत्ता विचारला असता मी जैताना येथे राहतो व माझे नाव अजय राजेंद्र भवरे असल्याचे सांगितले. त्यावर राग आलेल्या वडिल व भावाने जातीवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत मैत्रिणीच्या वडिलांनी घरात पडलेल्या काठीने डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर इतर नातेवाईकांना दोघांनी बोलवत त्यांच्याकडूनही मारहाण करून घेतली.
त्यानंतर घरात चोर घुसल्याचा खोटा बनव करून पोलिसांना बोलावले. मारहाणीत गंभीर जखमी झालेला असल्याने पोलिसांनी काही इसमा समवेत जैताना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी पोलिसांनी मोबाईल मध्ये व्हिडिओ काढून हकीकत जाणून घेतली व त्यानंतर तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्याचा सल्ला दिल्याने त्या ठिकाणी दाखल केल्याचे अजय याने सांगितले.
त्यानंतर अजय याच्यावर उपचार सुरू असताना तो बेशुद्ध झाला. त्यानंतर अजयच्या मैत्रिणीच्या पालकांची माहिती काढली असता तुकाराम बाळू शिंदे, वैभव तुकाराम शिंदे, रावसाहेब बाळू शिंदे व रवींद्र चैत्राम धनगर (रा. सर्व जैताणे ता. साक्री) असल्याचे समजले.
दरम्यान शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अजयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात वरील चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे.