धुळ्यात घडले खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन
धुळ्यात घडले खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन..!
(खान्देश वार्ता)-धुळे
मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा….
पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा….
कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती धुळे जिल्हा पोलिस दलाने सत्यात उतरवल्या आहेत. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीसांतल्या माणुसकीची दिव्य प्रचिती दाखवली आहे. शहरातील रोहिदास आल्हाद हे दृष्टीहीन दिव्यांग असून ते पत्नीसह नवीन वर्षाची दिनदर्शिका विक्री करीत आहेत.
ही बाब पोलीस अधीक्षक श्री.धिवरे यांच्या लक्षात आली. आणि त्यानी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व विभागांमध्ये लावण्यासाठी दिनदर्शिका घेतल्या. या बदल्यात खाकीतील माणुसकीचे दर्शन घडवत पाच हजार रुपये भेट देण्यात आले.
पोलीसांबद्दलच सर्वसामान्यांच्या मनात फारसे चांगले मत असते असे नाही. मात्र परंतु धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मात्र जिल्ह्यात पदभार घेतल्यानंतर याला छेद दिला आहे. अधीक्षक श्री.धिवरे यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर शहराला शिस्त लावण्यास सुरुवात केली. यात अवैध व्यवसाय, शहरातील वाढती गुंडगिरी, तरुणींची छेड काढण्याचे प्रकार मोडीस काढले आहेत. या सर्व कारवाया करीत असताना अधीक्षक श्री. धिवरे यांना रोहिदास आल्हाद व पत्नी गंगुबाई आल्हाद हे दोन्ही दिनदर्शिका विक्री करत असल्याचे प्रसारमाध्यमातून समजले.
त्यानंतर तात्काळ त्यांनी गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना या दांपत्याला आपल्या कार्यालयात आणण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सोमवारी सकाळी दृष्टीहीन दांपत्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले. दृष्टिहीन रोहिदास आल्हाद हे दिनदर्शिका विक्री करण्याबरोबर सुंदर बासरी वादक देखील आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयात आल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षकांसह समोर मराठी, हिंदी गाण्याच्या बोलावर सुंदर बासरी वाजवून दाखवली. दृष्टीहीन बासरी वादकाने मराठी हिंदी गाण्यांचा ठेका आपल्या बासरीवर धरल्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
तसेच दृष्टिहीन रोहिदास आल्हाद यांच्याकडून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व दिनदर्शिका विकत घेऊन खाकीतील माणुसकीचा धर्म जोपासत सढळ हाताने पाच हजारांची मदत केली.
One Comment