(खान्देश वार्ता)-धुळे
जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक तथा नंदुरबार जिल्ह्यात बदलून गेलेले हेमंत प्रभाकर पाटील यांच्या विरोधात एका महिलेच्या तक्रारीवरून देवपूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पथक रवाना झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक संंजय बारकुंड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
सन २०२२ पासून ते दि.११ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पीडित महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी करून अश्लील वक्तव्य केले होते. मोबाइलवरुन व्हिडीओ कॉल करुन महिलेस विवस्त्र होण्यास भाग पाडले. पीडितेला समाजात तुझी बदनामी करेल असे वेळोवेळी धमकाविले. नग्नावस्थेत व्हिडीओ रेकॉर्ड करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. पीडितेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह इतरांविरोधात शनिवारी रात्री देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास शहर पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.
बारकुंड यांनी सांगितले, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या संदर्भातील गोपनीय अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे. त्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी धुळ्यात मोठ्या पदावर काम करीत असल्यामुळे पीडिता तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हती. आता त्या अधिकाऱ्याची बाहेरील जिल्ह्यात बदली झाल्याने हिंमत करून तक्रार दाखल केली असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. पीडित महिलेला काही धोका निर्माण होऊ नये यासाठी पुरेसा बंदोबस्त देण्यात आला आहे असेही बारकुंड यांनी सांगितले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे, शहर पोलिस निरीक्षक आनंद कोकरे उपस्थित होते.