
खान्देश वार्ता-(धुळे)
मागील दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर ‘रोहित सानप’ नावाच्या तरुणास जबरदस्त मारहाण झाल्याची व जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. काल रोहित सानप याचे खुले पत्र वाचण्यात आले. यासह दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोड्या, गँगवार, अवैध धंद्यांनी गाठलेला कळस यावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी आपल्या शैलीतून जिल्हा पोलिस दलाला चांगलेच भोसडले आहे. वरमाय छिनाल ते वऱ्हाड कसं ठिकाणवर राहीन..? असा उपमर्द केला आहे.
ते आपल्या पत्रकात म्हणतात की, वरमाय छिनाल असेल तर, वऱ्हाड कसे ठिकाणावर राहील? अशी अवस्था आज पोलिस यंत्रणेची झाली आहे. मी मागे एकदा म्हणालो होतो, गुन्हेगारांचा सरदार बदलला पण टोळी तशीच कार्यरत आहे. या वस्तुस्थितीचा प्रत्यय धुळे जिल्ह्यातील जनतेला पदोपदी येत आहे. सर्व गुंड बदमाशाना अंतर्गत संदेश दिला आहे की, तुम्ही नंगानाच घाला, लोकांचे मुडदे पाडा, आया बहिणींची अब्रु लुटा, धर्मयोद्धा तुमच्यासाठी युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. धुळे शहरात खुलेआम गोळीबार होतो. एकदा नव्हे तर, मागील चार महिन्यात तीन वेळा अशा घटना घडल्या आहेत. दिवसाढवळ्या घरफोड्या होतात, त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही. रोज दुधाचा रतीब घातल्याप्रमाणे पोलीस अधीक्षक सोशल मीडिया समोर येऊन सांगत असतात, असे करा! तसे करा! ही काळजी घ्या! मग तुम्ही पगार घेता कशाचे? आम्हीच काळजी घ्यावी आम्ही सर्व करायचे मग पगार घेता कशासाठी!
पोलिसांच्या अंगावरील खाकी कपड्यांपेक्षा, एसटीच्या कंडक्टरच्या अंगावरील खाकी कपड्यांना जास्त किंमत आली आहे याचे इतके दुर्दैव काय? मला एकदा असेच पोलीस अधीक्षक यांनी उत्तर दिले होते की ‘गोटे साहेब, सट्यांच्या पेढ्या कुठे आहेत? आम्हाला दाखवा!’ मी तेव्हा त्यांना ताडकन उत्तर दिले होते ‘जिथून तुमचे पोलिस हप्ते गोळा करून आणतात आणि त्याचा हिस्सा तुम्हाला देतात, ती ठिकाणे सट्यांच्या पेढ्या आणि नंबर २ चे धंद्याचे ठिकाण!’ तेही तुम्हाला माहीती नसेल तर सॅनिटरी इन्स्पेक्टरपेक्षा तुम्ही निपत्तर आहात! सत्तारूढ पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना सांगतात की मी तुमची ‘लाईन लावून’ देतो. म्हणजे काय करतो? तर त्या भागातल्या पोलिस स्टेशनला फोन करून, हा आमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याच्या सट्यांच्या पेढीकडे दुर्लक्ष करा ! धुळे शहरामध्ये ५००/७०० सट्यांच्या पेढ्या होत्या. त्याच धुळे शहरात आज किमान २००० तरी सट्यांच्या पेढ्या आहेत. बेरोजगारांना रोजगार देण्याचा हा शासन मान्य व्यवसाय झालेला आहे.
मी चार वर्षांपूर्वी गांजा तस्करी बद्दल आणि पोलिसांच्या भागीदारीमध्ये वनखात्याच्या १५०० एकर जमिनीवर गांजाची शेती केली जाते. हे पुराव्यासह मांडले होते. त्यावेळी काही दलाल पुढारी आणि त्यांची चाटूगिरी करणाऱ्या चौथ्या स्तंभातील लोकांनी माझ्यावर टीका केली होती. त्याही वेळेला मी देशी कट्ट्यांच्या तस्करी बद्दल म्हणने मांडले होते. दिवसाढवळ्या तलवारी बाहेर काढल्या जातात. गोळीबार होतो, लोकांची घरे आणि प्लॉट बळकावले जातात. जमिनीच्या बोगस नोंदी करून, गरिबांवर अत्याचार केले जातात. हद्दपार गुंड शहरात मोकळेपणाने संचार करतात. फरार आरोपी दोन/दोन वर्षे फरार होतात? आणि त्याची साधी पोलिस स्टेशनला नोंद होत नाही. हे चांगल्या शिस्तप्रिय प्रशासनाचे लक्षण समजावे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.