खान्देश वार्ता-(धुळे)
शहरातील आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौलीगंज परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मद्यप्राशन करून आझादनगर पोलीस ठाण्यातील साध्या वेशातील दोन कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री कर्तव्यावर असतांना मालेगाव येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला दमदाटी करीत हुज्जत घालती. यानंतर त्याला मारहाण केल्याचे समजते. तर या घटनेमुळे शनिवारी रात्रीपासून मौलीगंज परिसरात अनेक चर्चांना उधान देखील आल्याचे समजते.
याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, आझादनगर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी कॉटन मार्केट जवळील मोकळ्या जागेत शनिवारी रात्री कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करीत होते. त्यानंतर ते मौवलीगंज परिसरात गस्त घालण्यासाठी आले. त्याठिकाणी मालेगाव पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता.
यावेळी आझाद नगर पोलीस ठाण्यातील दोन्ही कर्मचाऱ्यांनी मालेगाव पोलिसाला अचानक दमदाटी करीत त्याच्याशी हुज्जत घातली. यावेळी मौवलीगंज परिसरात १००हुन अधिक जणांचा जमाव एकवटला होता. याचवेळी परिसरातून अज्ञात नागरिकांनी वरिष्ठ पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता वरिष्ठांनी आझादनगर पोलीस ठाण्यात साध्या वेशातील दोन्ही कर्मचारी व मालेगाव पोलीस यांना जाण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही कर्मचारी व मालेगाव पोलिस आझादनगर पोलीस ठाण्यात आले. त्यावेळी देखील मालेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्याला दोन्ही कर्मचाऱ्यांनी दमदाटी व मारहाण केल्याचे समजते.
यावेळी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले. मात्र मालेगाव येथील पोलीस कर्मचाऱ्याने देखील आझाद नगर पोलीस ठाण्यातील त्या दोन्ही पोलीस कर्मचारी विरोधात तक्रार देण्याचे ठरवले. याबाबत काही काळ एकमेकांमध्ये बोलणे झाले. अखेर दोन्हींमध्ये परस्पर विरोधी समझोता झाल्यानंतर या प्रकरणाला मध्यरात्री उशिरा पूर्णविराम मिळाला.
मात्र आझादनगर पोलीस ठाण्यातील दोन्ही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून आपल्याच खात्यातील पोलीस कर्मचाऱ्याशी दमदाटी व हुज्जत घालत मारहाण करीत होते. हे कितपत योग्य आहे.? अशी चर्चा ही मौवलीगंज परिसरातील नागरिकांमध्ये रंगली होती. मात्र या घटनेचा जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल तपास केला तर नेमकं काय ते स्पष्ट होऊ शकते. अशी माहिती ही या घटने ठिकाणी असलेल्या नागरिकांनी दिली आहे.