क्राईमधुळे

निम्म्या किमतीत कॉपर केबल देण्याचे अमिष दाखवून मुंबईच्या पार्टीला लुटले

तीन जण ताब्यात, १३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

खान्देश वार्ता-(धुळे)
मुंबईतील एका पार्टीला स्वस्तात कॉपर केबल देण्याचे आमिष दाखवून मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांच्या आत जेरबंद करण्यात जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १३ लाख ५० हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. साक्री तालुक्याच्या जामद्यातील ठग हे स्वस्तातील कॉपर वायरचे आमिष दाखवून लुटमार करण्यासाठी कुख्यात आहेत.

या ठगांनी मुंबईतील इंजिनिअरींग वर्कशॉचे मॅनेजर सर्वेश सोनाळकर यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला. तसेच आमच्याकडे उत्कृष्ट दर्जाची कॉपर वायर असून आम्ही ती तुम्हाला निम्मे किमतीत देवू असे आमिष दाखविले. त्यानुसार ४४ टन कॉपर वायर २ कोटी ४४ लाख रुपयांत देण्याचे ठरले. त्यासाठी ठगांनी २२ ते २३ लाखांची आगाऊ रक्कमेची मागणी केली. त्यानुसार मुंबईतील इंजिनिअरींग वर्कशॉपचे मालक हरिष सुजेश पवार, मॅनेजर सर्वेश सोनाळकर, गायत्री सोनाळकर व त्यांचे बॉडीगार्ड नितीन मोरे, हुकूमसिंग प्रकाशसिंग, महेश निंबाळकर, शिवाजी गुंजाळ, अरुण विश्वकर्मा हे दोन चारचाकी वाहनांने बुधवार (दि.२९) रोजी निजामपूर जवळील पेटले गावाच्या शिवारातील सुझलॉन कंपनीजवळ आले.

सुझलॉन कंपनीच्या गेटवर हे ठग अगोदरच उभे होते. यात इक्बाल चव्हाण (रा. जामदा, निजामपूर ता. साक्री) अनुप शर्मा, अमित नाईक, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश ऐंकी पवार, राजेश पवार व अन्य दोन-तीन जणांचा समावेश होता. त्यांनी मुंबईतील या पार्टीला मारहाण करुन हरिष पवार यांच्या ताब्यातून २२ लाख ३ हजारांची रोकड, २ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण २४ लाख ५८ हजारांचा ऐवज लुटून नेला.

या घटनेनंतर हरिष पवार यांनी निजामपूर पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत यातील तिघाना ताब्यात घेऊन १३ लाख ५० हजारांची रोकड निजामपूर पोलिस ठाण्यात तील सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व पथकाने जप्त केली आहे.

सदर ही घटना ड्रॉप केस या प्रकारातील असून या घटनेतील तीन आरोपींना तात्काळ अटक करुन १३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरात लवकर ताब्यात घेतले जाईल. तसेच १०० टक्के मुद्देमाल रिकव्हर केला जाईल. अशा प्रकरच्या अनेक घटना जामदा या गावात घडलेल्या आहेत. त्यामुळे कोणीही स्वस्तातील कॉपर वायरच्या आमिषाला बळी पडू नये. असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

Advertisement JC Techsoft Solution

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + fourteen =

Back to top button