खान्देश वार्ता-( धुळे) अहिरानी साहित्य संमेलनातून भाषेचा जागर होत आहे हे जरी उत्तम असले तरी भाषा जीवंत ठेवण्यासाठी भक्कमपणे काम करावे लागेल. भाषेसाठी फक्त तळमळ दाखवून चालणार नाही तर त्यासाठी साहित्य आणि भाषेच्या प्रातांत मजबूतपणे पाय रोवून उभे राहिले पाहिजे. खेड्यापासून तर मोठमोठ्या शहरात अहिरानी भाषा पोहचली आणि बोलली गेली पाहिजे. आहिरानी भाषेला समृध्द इतिहास असून ती संस्कृत भाषेपेक्षाही आगोदरची भाषा असल्याचे प्रतिपादन सातवे अहिरानी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सुधीर देवरे यांनी केले.
दरम्यान आपल्याच भाषेतील साहित्याचे ज्ञान मिळावे म्हणून अशा बोली भाषेतील साहित्य संमेलन महत्वाचे असतात. कारण साहित्य संमेलनातून समाजाला दिशा मिळत असते असे उदगार महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून केले. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी अहिरानी भाषेला उत्तम दर्जा प्राप्त व्हावा म्हणून हा प्रयत्न असून त्यांनी दूरध्वनीव्दारे शुभेच्छा दिल्या.
जय अहिरणाी…जय खान्देश…च्या गर्जना आणि दींडी उनी..दिंडी उनी अहिरानीनी दिंडी उनी म्हणत ग्रंथदिंडीने साहित्य रसिकांचे लक्ष वेधले होते. अहिरानी साहित्य संमेलनानिमित्ताने आलेल्या साहित्यिकांच्या मांदियाळीने नेर ता.धुळे येथे अहिरानीची पंढरी अवतरल्याची अनुभूती पहायला मिळाली.
खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र, धुळे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (दि.२५) रोजी एकदिवसीय सातवे अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन झाले. संमेलन स्वा.सेनानी कै.आण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी बालाजी लॉन नेर ता.धुळे येथे हे संमेलन उत्साहात पार पडले. अहिरानी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अहिरानी साहित्यिक डॉ.सुधिर देवरे हे होते. तर उदघाटन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना डॉ.सुधिर देवरे यांनी सांगितले कि, संस्कृत भाषेपेक्षाही जुनी अहिराणी भाषा आहे. आज अनेक बोली भाषा लुप्त होत चालल्या आहेत. अहिरानी भाषा बोलतांना अनेकांना कमीपणा वाटतो. म्हणून खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत अहिरानी भाषा बोलली बेली पाहिजे. आपल्या बोली भाषेचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. अहिरानी भाषेची श्रीमंती जपण्यासाठी आपल्याला कंबर कसून कामाला लागले पाहिजे. खेड्यांचे शहरीकरण होत आहे तस तसे अहिरानी भाषेची पिछेहाट होत आहे.
अहिरानीला शहरात जागाच उरली नसल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली.म्हणून अहिरानी भाषा जगविण्यासाठी साहित्यिकासोबत सर्वच अहिरानी भाषिकांनी खंबीरपणे पाठीमागे उभे राहून आपल्या बोली भाषेसाठी काम केले पाहिजे असे आवाहन डॉ.सुधीर देवरे यांनी केले.
संमेलनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलतांना आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी सांगितले कि, आपल्या मायबोलीबद्दल आपल्याला प्रेम असावे कारण बोली भाषा ही आपली आई असते. कवियत्री बहीणाबाई चौधरी यांनी कल्पनेपलिकडे लिखाण केले आहे. त्यांच्या कविता आपल्याला रडायचे नाही तर लढायचे शिकवितात. आपल्या बोली भाषेचे साहित्य जनतेपर्यंत पोहचावेत म्हणून अशी संमेलने महत्वाची असतात. साहित्य संमेलने समाजाला दिशा देत असतात. असे भास्करराव पेरे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान ग्रामविकासावर बोलतांना त्यांनी सांगितले कि, गावात जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत त्यात फळ झाडांचे प्रमाण अधिक असावे,पाणी शुध्द असावे, गावात स्वच्छता असावी, मुलांचे शिक्षण आणि चांगले संस्कार झाले पाहिजे. घरातील वृध्द माणसांवर प्रेम करा या गोष्टी केल्या तर घरात आणि गावात आनंद व समृध्दी नांदेल. काळानुरुप झालेले बदल स्विकारले पाहिजे आपापसातील मतभेद दूर करुन गावाच्या विकासाला प्राधन्य द्यावे. असा मुलमंत्र त्यांनी संमेलनानिमित्त दिला.
आहिराणी संमेलनासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ.धनंजय गुडसूरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले कि, अहिरानी भाषेत अविट गोडी असल्याने मी तब्बल सातशे किलोमीटर अंतरावरुन अहिरानी संमेलनासाठी आलो. महाराष्ट्रात सर्व भाषा भगिनी म्हणून काम करीत आहेत. अहिरानीसारख्या सर्व बोली भाषा जगल्या पाहिजे म्हणून साहित्य मंडळ काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाला प्रमुख अथिती म्हणून राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ.धनंजय गुडसूरकर, अहिराणी संमेलनाचे माजी अध्यक्ष रमेश बोरसे, सुभाष अहिरे, जगदिश देवपूरकर, जि.प.सदस्य आनंद पाटील,सरपंच गायत्री जयस्वाल, बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ.दरबारसिंग गिरासे, बाळु आनंदा पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, भास्करराव सोनवणे ग्रामसेवक,डॉ.सदाशिव सुर्यवंशी,प्राचार्या रत्नाताई पाटील,डॉ.सतिष पाटील,ज्येष्ठ पत्रकार गो.पी.लांडगे,चंद्रशेखर पाटील,डॉ.दत्ता परदेशी,शिवाजी पाटील, बापू खैरनार,गणेश जयस्वाल,कांतीलाल पाटील आदी उपस्थित होते. उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.सदाशिव सुर्यवंशी यांनी केले तर साहित्य संमेलनाचे सुत्रसंचालन जगदिश देवपुरकर, पुनम बेडसे यांनी केले.
आमदार कुणाल पाटील यांच्या फोनवरून शुभेच्छा….
माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची तब्येत बरी नसल्याने आ.कुणाल पाटील हे कोल्हापुर येथे गेले आहेत. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र अहिराणी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी संमेलन सुरु झाल्यावर भ्रमणध्वनीव्दारे फोन करुन शुभेच्छा दिल्या व साहित्यिकांचे स्वागत केले. अहिरानी संमेलन दिमाखात व्हावे अशी माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची इच्छा आहे आणि त्यांना मी संमेलनाची माहिती दिली तेव्हा त्यांनी आनंद व्यक्त केला. अहिरानी भाषेला उत्तम दर्जा मिळावा म्हणून आमचा हा नेहमीच प्रयत्न असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी यावेळी सांगितले.
अहिरानी आणि खान्देश लोकसंस्कृतीचे दैवत गोराई,कानबाईच्या पुजनाने अहिरानी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कवियत्री बहीणाबाई चौधरी यांच्याही प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तर महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुख्मिणीचेही पुजन करण्यात आले. अस्सल खान्देशी बाज उदघाटन समारंभाला मिळाल्याने सहित्य रसिक भारावून गेले होते.
सातवे अहिरानी साहित्य संमेलनानिमित्ताने नेर गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. अहिरानी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष रमेश बोरसे, डॉ.सदाशिव सुर्यवंशी, विश्राम बिरारी, बाळू सोनवणे, जि.प.सदस्य आनंद पाटील,सरपंच गायत्री जयस्वाल, शंकरराव खलाणे, गणेश जयस्वाल यांच्या हस्ते ग्रंथांचे पुजन करुन ग्रंथ दिंडीची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी विद्यार्थीनींनी खान्देशी पेहराव करीत दिंडीत सहभाग घेतला. यावेळी कानबाई, मंगलकलश, तुळस डोक्यावर घेत दिंडीतून खान्देशाचे प्रतिक उभे केले. नेरसह परिसरातील भजनी मंडळाने अहिराणीची महीती सांगणारी लोकगिते,भजन,कानबाईची गाणी सादर केली. तर दींडी उनी..दिंडी उनी अहिरानीनी दिंडी उनी या उत्स्फूर्त गिताच्या चालीवर परिसर मंत्रमुग्ध झाला. विद्यार्थ्यांनी जय अहिराणी…जय खान्देशच्या गर्जना करीत उपस्थितांच्या उर अभिमानाने भरुन आला. ग्रंथ दिंडीत नेर येथील विविध भागातील जिल्हा परिषद शाळा,डि.के. खलाणे कन्या शाळा, न्यू इंग्लिश स्कूलया शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी व शिक्षक सहभागी झाले होते.
अहिराणी भाषेतील पुस्तक प्रदर्शन व विक्री…..
अहिरानी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून स्वा.सेनानी कै.आण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी बालाजी लॉन नेर या संमेलनस्थळी पुस्तक प्रदर्शन दालन उघडण्यात आले होते. त्यात अहिरानी साहित्याची मान्यवर कवी आणि लेखकांची पुस्तक प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. वाचकांकडून या पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेती मातीच्या कविता आणि माय ममतेचे अचूक दुख मांडणार्या कविता सादर करीत अहिराणी कवींनी आपली प्रगल्भता कवी संमेलनातून सिध्द केली. आहिराणी साहित्य संमेलनात चार सत्रात कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी खान्देशासह महराष्ट्र, गुजरात तसेच विविध भागातून अहिराणी कवी सहभागी झाले होते. आशयपूर्ण आणि जीवन जगण्याचा अर्थ सांगणार्या कवितांनी काव्य रसिक चिंब झाले होते.
अहिराणी साहित्यिक कवींची मंदीयाळी……
सातवे अहिरानी साहित्य संमेलनानिमित्त नेर गावाला उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते. संमेलनासाठी खान्देशासह महाराष्ट्रातील आणि इतर राज्यात स्थित असलेले अहिराणी साहित्यिक सहभागी झाले होते.त्यात साहित्यिक डॉ.सुधिर देवरे, कवी रमेश बोरसे,अहिरानी साहित्यिक सुभाष बोरसे,लोककवी सिनेगितकार प्रशांत मोरे,डी.बी.जत्पुरीया,नाट्य परिषदेचे सदस्य चंद्रशेखर पाटील,डॉ.शकुंतला चव्हाण,जगदिश देवपूरकर, डॉ.सदाशिव सुर्यवंशी,कवी शरद धनगर, कवी रमेश धनगर, प्राचार्य रत्नाताई पाटील, प्रविण पवार,डॉ.नरेंद्र खैरनार, विजय निकम, मनिषा पाटील, विजया पाटील, एकनाथ गोफणे, ज्ञानेश्वर भामरे,विनोद बागुल, सुनिता पाटील, वृषाली खैरनार, डॉ.कुणाल पवार, शरद पाटील, एम.के.भामरे, जितेंद्र देसले, मोहन कवळीथकर, शिवाजी साळुंखे, नामदेव महाजन, डॉ.वाल्मिक अहिरे, कमलेश शिंदे, विकास पाटील, प्रकाश पाटील ,जया नेरे आदी नामवंत साहित्यिक व कवी उपस्थित होते.
जीवन गौरव पुरस्कार ….
अहिरानी साहित्य क्षेत्रात विशेष लिखाण आणि अहिरानी साहित्यसाठी जीवन वाहिलेल्या साहित्यिकांचा यावेळी डॉ.वसंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. पहिले अहिरानी साहित्य संमेलनाचे आयोजक स्व.डॉ. वसंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ सहावे अहिरानी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी रमेश बोरसे आणि सातवे अहिरानी संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर देवरे यांनां हा पुरस्कार देण्यात आला. डॉ.शकुंतला चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
संमेलनातील ठराव……
खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र, धुळे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय अहिरानी साहित्य संमेलन दिमाखात पार पडले साहित्य संमेलनाचे औचित्य साधुन यावेळी काही महत्वाचे ठराव करण्यात आले. त्यात अहिरानी भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळावी व संवैधानिक आठव्या अनुसूचित समावेश करण्यात यावा, प्राथमिक,माध्यमिक व उच्च शिक्षण अभ्यासक्रमात अहिरानी भाषेचा समावेश करावा व जनगणना करतांना मातृभाषा म्हणून रकाना समाविष्ट करावा, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलामुलींचे शिक्षण मोफत व त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी, उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करुन खानदेशाचा विकासात्मक अनुशेष भरुन काढावा या मागण्यांचा ठरावात समावेश होता. या सर्व ठरावांना साहित्यिक व उपस्थित साहित्यप्रेमींच्यावतीने मंजुरी देण्यात आली.