अक्कलपाडा योजनेतून धुळेकरांची सर्वात मोठी फसवणूक मा.आमदार अनिल गोटे
खान्देश वार्ता-(धुळे)
शहराला अक्कलपाडा धरणातून येणारे पाणी हे नैसर्गिक उताराने नव्हे तर २५० अश्वशक्तीच्या पाच पंपाने येते. तापी पाणीपुरवठा योजना व अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना यात तत्वतः व गुणात्मक फरक नाही. तापी पाणीपुरवठा योजनेचे दरमहा ८० लाखाचे बिल अदा करावे लागते. पण आता अक्कलपाडा योजनेची ही दर महिन्याला २५ ते ३० लाखांची नवीन भर पडली आहे.
अक्कलपाडा योजना नैसर्गिक उताराने नव्हे तर विजेवर कार्यरत असून तरी देखील नैसर्गिक उताराचा खोटा दावा केला जात आहे. धुळेकर जनतेची ही शंभर वर्षातील सर्वात मोठी फसवणूक असल्याचा आरोप मा.आ. अनिल गोटे यांनी सोमवारी पत्रकारासमवेत प्रत्येक्ष पाहणीत हा प्रकार उघडकीस आणला.
धुळे शहराला पिण्यासाठी नेहमीच पाणी मिळावे यासाठी अक्कलपाडा प्रकल्पामध्ये ४०० एमसीएफटी पाण्याचा साठा राखीव ठेवला आहे. सदर पाणी धुवेकरांना मिळावे यासाठी तब्बल १७३ कोटी रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करून योजनेचे काम हाती घेण्यात आले खरे तर तापी पाणीपुरवठा योजना व अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना यात तत्वतः गुणात्मक कुठलाही फरक नाही. कारण तापी पाणीपुरवठा योजनेत पाणी उचलण्याकरता ४५० अश्वशक्ती क्षमतेचे पाच पंप लावले आहेत. या पंपातून रोज किमान ५० ते ६० एमएलटी म्हणजेच एक ते दीड एमसीएफटी पाणी आणता येऊ शकते.
त्यासाठी वीज बिलाचे दरमहा ८० लाख रुपये खर्ची पडतात. तर १७३ कोटी रुपये खर्च करून २५० अश्वशक्तीच्या लावलेल्या पाच पंपांपैकी दोन किंवा तीन पंपांवरून एक एमसीएफटी पाणी मिळते. म्हणजे दर महिन्याला किमान एक कोटी १० लाख ते एक कोटी २० लाख रुपये वीज बिलापोटी महापालिकेला भुर्दंड बसतो. तापी पाणीपुरवठा योजनेतून जामफळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणावयाचे पाणी ४५० अश्वशक्ती पंपांनी आणावे लागते. जामफळ येथून नैसर्गिक उताराने धुळे शहराला पाणीपुरवठा होतो. तर अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेत योजनेतून पाणी शुद्ध करून धुळे शहराला पाणीपुरवठा केला जातो.
एक एमसीएफटी पाणी उचलण्यासाठी व जलशुद्धीकरण केंद्रासाठी साधारणता वीज बिलाचा २५ ते ३० लाखांचा खर्च अनिवार्य आहे. मोठा गाजावाजा व आरडाओरडा करून केलेल्या अक्कलपाडा योजनेत व धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी केलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेत काडी मात्र फरक नाही. वास्तविक अक्कलपाडा धरणातून मृत पाण्याचा साठा हा रिक्त करण्याकरता केलेल्या सुविधेतूनच पुढील पाईपलाईन केली असती तर नैसर्गिक उताराने एक रुपयाही विजेचा खर्च न येता धुळे शहराला पाणीपुरवठा करता आला असता अथवा कोयना प्रकल्पाचे अनुकरण करायला हवे होते असेही गोटे यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.
नव्यानेच कार्यान्वित केलेल्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला आता किमान सात ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे भाग्य उजळले आहे. पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना व जनावरांना पिण्यासाठी महापालिकेने शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले आहे. तसेच तापी पाणीपुरवठा योजनेलगत असलेले शेतकरी ही भाग्यवान आहेत. शहरालगत असलेल्या नगाव शिवारातील अजमेरा यांच्या फार्मसी कॉलेजच्या बाजूला असलेल्या नाल्यातून बिलाडी शिवारातील धरण पूर्ण भरले आहे. सदर तापी योजनेचे पाणी न्याळोत या गावाच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे.
काही गेल्या पंधरा-वीस दिवसात घडलेली घटना नाही, तर गेल्या पाच महिन्यांपासून फुटलेल्या अथवा फोडलेल्या पाईपलाईनमुळे भीषण दुष्काळातही या भागातील विहिरी तुंबलेल्या आहेत. महापालिका क्षेत्रालगत असलेल्या शेतकऱ्यांची काळजी घेणारी अशी महापालिका जगात शोधूनही सापडणार नाही. एका अर्थाने महापालिका प्रशासन व तात्कालीन राज्यकर्त्यांचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नदीजोड प्रकल्प साकार केल्याबद्दल अभिनंदन केले पाहिजे. असा टोलाही मा.आ. तथा लोकसंग्रामच्या संस्थापक अध्यक्ष अनिल गोटे यांनी लगावला.