धुळे ते अयोध्या पहिली एसटी बस मार्गस्थ
खान्देश वार्ता-(धुळे)
श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत श्रीरामांचे भव्य मंदिर साकारल्यानंतर श्रीराम भक्तांना प्रभूंच्या दर्शनाची ओढ लागली आहे. यामुळे श्रीराम भक्तांना दर्शन घेता यावे यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून धुळे ते आयोध्या बस ४१ प्रवासी घेऊन शनिवारी पहाटे अयोध्येकडे मार्गस्थ झाली. फटाकांची आतिषबाजी व श्रीरामाचा जयघोष करत ही बस प्रवाशांना श्रीरामांचे दर्शन घडवण्यासाठी मोठ्या उत्साहात मार्गस्थ करण्यात आली. चार दिवसांच्या प्रवासानंतर ही बस धुळ्यात परतणार आहे. अशी माहिती विभाग नियंत्रक विजय गीते यांनी दिली आहे.
आयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात आले आहे. गेल्या महिन्यात श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर मंदिरात श्रीराम भक्तांची गर्दी होत आहे. तिथे जाणाऱ्या भाविकांची संख्या व प्रवाशांची मागणी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने शनिवारी धुळे ते आयोध्या ही स्वतंत्र बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
या बसला प्रवाशांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत ४१ शीट बुक झाले. या बसला महामंडळाकडून आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी बस समोर फटाक्यांची आतिषबाजी करत विभाग नियंत्रक विजय गीते यांनी श्रीरामाच्या घोषात ही बस अयोध्याकडे मार्गस्थ केली. यावेळी प्रवाशांना निरोप देण्यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. अयोध्या प्रवास कसा असेल याबाबत माहिती देताना महामंडळाच्या अधिकारी विजय गीते यांनी सांगितले की, चार ते पाच दिवसांची ही यात्रा असून प्रवासांच्या इच्छेनुसार तीन ते चार ठिकाणी मुक्काम होणार आहेत सुमारे २८०० ते २९०० कि.मी. चा हा प्रवास असून बस दररोज ५०० ते ६०० किमी प्रवास करेल.
प्रवाशांना या बसमध्ये पाणी, मोबाईल चार्जिंग पॉइंट इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. पहिल्याच बसला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात ३९ प्रवाशांनी चार-पाच दिवसात बुकिंग केले होते. ३९ प्रवासी, दोन अधिकारी असे ४१ जणांसह दोन चालक आयोध्यासाठी रवाना झाले आहेत. धुळे ते अयोध्येसाठी प्रति प्रवासी ४ हजार ५४५ रुपये परतीचे तिकीट महामंडळाकडून आकारण्यात आले आहे.
यावेळी विभाग नियंत्रक विजय गीते, विभागीय कामगार अधिकारी प्रवीण पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक वासुदेव देवराज, आगार व्यवस्थापक पंकज देवरे, मनोज पवार, विभागीय सांख्यिकी अधिकारी सुरज माळी, स्थानकप्रमुख आर आर वाघ, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अजय जावरे, वाहतूक नियंत्रक चंद्रकांत गोसावी, हेमराज साळुंखे, विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे, यंत्र अभियंता पंकज महाजन, यांच्यासह महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.