(खान्देश वार्ता)-धुळे
शहरात विनापरवाना गुंगीकारक औषधांच्या बाटल्या विक्री करण्यासाठी आलेल्या सुरत येथील नशा तस्करांच्या मुसक्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व पथकाने आवडल्या आहेत. त्यांच्याकडून १००मि.ली.च्या तब्बल ३५७ खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पण नशेसाठी विक्री होणाऱ्या औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या कामगिरीने नशेच्या औषधांची गोळ्यांची विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सुरत येथील मोहम्मद शाह अहमद शहा (रा. मिठी खाडी सुरत) हा त्याच्याकडे मानवी मेंदूवर परिणाम विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गुंगीकारक औषधांच्या बाटल्या बाळगून आहे अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
या माहितीवरून गुन्हे शाखेने पथकाला सूचना केल्या. या बाटल्या मोहम्मद हा शोएबखान अजीज खान पिंजारी (रा. धुळे) हा विक्री करण्यासाठी धुळे शहरात रेल्वे स्टेशन परिसरात आला होता. गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांनी पथकासह रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता रस्त्याच्या बाजूला एक जण एका पांढऱ्या व जांभळ्या रंगाच्या प्लास्टिक गोण्या घेऊन उभा असलेला दिसला. याच दरम्यान एक जण त्याच्या ताब्यातील रिक्षाने त्याच्याजवळ आला.
संबंधित व्यक्तीने या गोण्यांमध्ये असलेले बॉक्स बाहेर काढले. आणि त्याला देत असल्याचे दिसून आले. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी छापा टाकून त्याला पकडले. त्याला नाव विचारले असता मोहम्मद अहमद शहा (रा. मिठी खाडी निंबायत आझाद चौक नूरानी मशिदीजवळ सुरत) तसेच शोएब खान अजित शाह पिंजारी (रा. चाळीसगाव रोड गजानन कॉलनी धुळे) असे असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून १०० मि.ली. च्या ३५७ गुंगीकारक औषधाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात कोडाईन्स फॉस्फेटच्या कप सिरप असलेल्या १००मि.ली. च्या ११९ बाटल्या तसेच त्याच पद्धतीच्या शंभर मिलीच्या २३८ बाटल्या अशा एकूण ३५७ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रत्येक बाटलीची किंमत १५० रुपये इतकी आहे.
पोलिसांनी ५३ हजार ५५० रुपयांचा मुद्द्यामाल जप्त केला असून (एमएच१८ एजे/६०२७) क्रमांकाची रिक्षा असा एकूण एक लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व पथकातील संजय पाटील, श्याम निकम, संदीप पाटील, सुरेश भालेराव, रवींद्र माळी, संतोष हिरे यांनी केली आहे.