(खान्देश वार्ता)-धुळे
राज्यात बंदी असलेला गुटखा धुळे जिल्हयात राजरोसपणे विकला जाताेयं, तो कोणाच्या कृपेने हे सर्वश्रृत आहे. मात्र कारवाई दाखविण्यासाठी पकडण्यात येणाऱ्या गुटख्यातही झाेलझाल केली जात असल्याची कुणकुण आहे. ताे दाखविण्यापुरता नष्ट करत उरलेला तस्कराला विकला जात असल्याची चर्चा सुरु आहे.
जेवण नाही मिळाले, पण नास्तावर भूक भागविण्याचा हा शिरस्ता असल्याचे समजते. यात पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाची बरोबरीची भागिदारी असल्याचेही चर्चिले जात आहे. असा प्रकार शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्यात नुकताच घडल्याचे ऐकिवात आहे. कर्तव्यलक्ष पोलीस अधिक्षक या प्रकाराच्या खोलात शिरुन सत्यता समोर आणतील अशी रास्त अपेक्षा जिल्हावासीयांना आहे. हा प्रकार म्हणजे कर्तव्यदक्ष पाेलीस अधीक्षकांच्या श्रमाला काळीमा फासण्याचाच धंदा आहे.
कारवाईतील गुटखा नष्ट करण्यासठी नेला जाताे, त्यातील काही माल दाखविण्यापुरता जाळून फोटो आणि व्हीडीओ करुन रेकाॅर्ड ठेवले जाते. मात्र, यातील काही माल हा जळगावच्या तस्कराला विकला जात असल्याची चर्चा आहे. असाच प्रकार गेल्या दोन वर्षापुर्वी धुळे तालुका पोलीस ठाण्यात सुद्धा घडला असल्याची माहितीही समोर आली आहे. रंजनी – गंधा गुटखा नष्ट करण्याच्या नावाखाली जळगावच्या तस्कराला विकण्यात आला होता. अन्नसुरक्षा व पोलीस विभाग यांच्यात चांगलाच ताळमेळ बसल्याने हे सर्व काही होत असल्याचे कळते.
मात्र या सर्व गोष्टी चर्चेत असतांना याबाबत अन्न व सुरक्षा विभागातील अधिकारींना विचारणा केली असता त्यांनी चर्चेला दुजोरा दिला नाही. हे सर्व भ्रामक असल्याचे सांगितले. दुसरीकडे सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारींनी अन्न व सुरक्षा विभागाकडेच सर्व माहिती मिळेल असे सांगून माहिती देण्यास टाळले आहे. यामुळे आता जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन गाैडबंगाल, नेमका काय प्रकार आहे याचे वास्तव समोर आणावे, अशी मागणी केली जात आहे.