नववर्षाच्या सुरुवातीलाच शिरपुरातील दोन मित्रांचा अपघाती मृत्यू
(खान्देश वार्ता)-धुळे
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शिरपूर शहरातील दोन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला आहे. कॅफे चालक तथा राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेले प्रवीण शिवाजी पाटील (वय४२) आणि बांधकाम व्यवसायिक प्रशांत राजेंद्र भदाने (वय३५) यांचा ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला.
दोन्ही मित्र शिरपूर शहरातील राहणारे असून टाटा कंपनीच्या हॅरीअर कारने शिरपूर-चोपडा रस्त्यावरून जात होते. त्यावेळी शिरपूर विमानतळ रस्त्यावर त्यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेले वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या दरीत कोसळले. ही तरी सुमारे ७० ते ८० फूट खोल असून काटेरी झुडपात त्यांचे वाहन खड्ड्यात कोसळल्याने वाहनाचे प्रचंड नुकसान होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना सोमवारी सकाळी या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना हे अपघाती वाहन दिसल्याने ही उघडकीस आली. नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनाजवळ जाऊन पाहिले असता दोन जण वाहनात मृत अवस्थेत पडले होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने दोघांना वाहनातून बाहेर काढण्यात आले.
यानंतर शिरपूर ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेह तपासणीसाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती शिरपूर शहरात पसरल्यानंतर शहरात सर्वत्र नववर्षानिमित्त आनंदोत्सव साजरा होत असताना या बातमीमुळे साऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले. अपघातात मृत झालेले प्रवीण पाटील यांचे शहरातील इंदिरा गांधी हॉस्पिटलजवळ कॅफेचे दुकान आहे तर ते राजकीय क्षेत्रात देखील सक्रिय होते. त्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क होता. तर प्रशांत भदाणे हे बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित होते. दोघांच्या अपघाती मृत्यूमुळे शिरपूर शहरात हळूहळू व्यक्त होत आहे.