वसुलीभाईचा ठेका संपल्यानंतरही वसुली सुरूच, धुळ्यातील राजे संभाजी उद्यानातील प्रकार
(खान्देश वार्ता)-धुळे
शहरातील देवपुर परिसरात पांझरा नदीकिनारी स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यामागे महानगरपालिकेच्या मालकीचे राजे संभाजी उद्यान आहे. गेल्या काही माहिण्यापासून या उद्यानाचा ठेका संपला असतांनाही संबंधित ठेकेदाराच्या माणसांकडून उद्यानात प्रवेशासाठी तिकीट वसुली केली जात असल्याचे मंगळवारी सायंकाळी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या निदर्शनास आले. दरम्यान यावेळी आयुक्त श्रीमती पाटील यांनी संबंधितांची चांगलीच कान उघडणी केली असून याठिकाणाहून आपले साहित्य बाहेर काढून तात्काळ मार्गस्थ होण्यास सांगितले आहे.
मनपा आयुक्त श्रीमती दगडे पाटील या मंगळवारी सायंकाळी राजे संभाजी उद्यानात सुरू असलेल्या चबुतऱ्याच्या कामाच्या पाहणीसाठी गेल्या हाेत्या. यावेळी पाहणी करतांना हे लक्षात आले. या उद्यानात कारंजे, झोके, घसरगुंडी, पाळणे, डॅशिंग कार अशी विविध प्रकारची खेळणी आहेत. शहरात गेल्या काही वर्षांपासून या उद्यानात दररोज लहान मुले मनोरंजनासाठी येतात. तर शनिवार-रविवार सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.
या उद्यानातील खेळणीसह देखभालीचा ठेका देण्यात आला होता. या ठेक्याचा अवधी संपल्यानंतर काेणत्याही प्रकारची तिकीट आकारणी करण्यात येऊ नये, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र तरी देखील अनधिकृत पणे तिकीट वसुली करून उद्यानात नागरिकांना प्रवेश दिला जात आहे. हे आयुक्तांच्या पाहणीत आढळून आल्याने तिकीट वसुली करणाऱ्या संबंधिताना चांगलेच फटकारले. तसेच संबंधित ठेकेदाराचे उद्यानात असलेले साहित्य तात्काळ उचलण्यास सांगितले आहे.
One Comment