नंदुरबार ते मुंबई पायी मोर्चा; लाल वादळ धडकणार मंत्रालयावर.
नंदुरबार ते मुंबई पायी मोर्चा; लाल वादळ धडकणार मंत्रालयावर..
(खान्देश वार्ता)-धुळे
आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह जंगलग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत, यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे नंदुरबारहून निघालेला पायी बिर्हाड महामोर्चा रविवार दि.१० डिसेंबर रोजी रात्री उशिरा धुळ्यात धडकला. त्यानंतर सोमवारी सकाळी मुंबईकडे रवाना झाला.
हा मोर्चा १७ दिवस ४३२ किलोमीटर पायपीट करीतमुंबई मंत्रालयावर धडकणार आहे. मोर्चा नंदुरबारहून साक्रीमार्गे धुळे, मालेगाव, नाशिक, मुंबई असा जाणार आहे. तर दि.२३ डिसेंबर रोजी मुंबईत पोहोचेल. सरकारने योग्य निर्णय न घेता महामोर्चा अडवल्यास त्याच ठिकाणी जेलभरो सत्याग्रह करण्यात येईल. असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. मोर्चामध्ये कॉ.रामसिंग गावीत, कॉ.करणसिंग कोकणी, कॉ.किशोर ढमाले, कॉ.सुभाष काकुस्ते हे मार्गदर्शन करत आहेत. नंदुरबारहून निघालेला मोर्चा आणि धुळ्यात दाखल झाल्यानंतर विविध मागण्याचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी मोर्चाचे मुख्य मार्गदर्शक असलेले कॉ. किशोर ढमाले यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींची शेती नष्ट करणाऱ्या गुंड मेंढपाळांवर अत्याचार करणाऱ्या विरोधात प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. पेसा कायदा व वनहक्क कायदा यावर आक्रमण करणारा वनसंरक्षण कायदा (दुरुस्त) २०२३ त्वरित रद्द करावा, मणिपूरमधील आदिवासींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करावी, बनावट आदिवासी हटवावेत. आणि आदिवासी यादीतील घुसखोरी थांबवावी. केंद्र शासनाने जनविरोधी वीज कायदा मागे घेऊन सर्व शेतीमालाला हमी भाव देणारा कायदा करावा, लखीमपूर-खिरीयेथे पाच शेतकऱ्यांना चिरडून ठार मारणाऱ्या भाजपा मंत्र्याच्या मुलावर कारवाई करावी, शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना जाहीर नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना हमीभाव व कष्टकऱ्यांना अनुदान देऊन अन्न सुरक्षा कायद्याची (रेशन) अंमलबजावणी करावी, ऊसतोडणी श्रमिकांसाठी मुंडे महामंडळाची अमंलबजावणी करावी, नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा, आदी मागण्या घेऊन आम्ही मुंबईकडे रवाना होत आहेत. अशी प्रतिक्रिया यावेळी कॉ.ढमाले यांनी दिली.